मध्य प्रदेशातील हर्दा जिल्ह्य़ात दुथडी भरून वाहणाऱ्या माचक नदीवरील पूल ओलांडताना दोन रेल्वेगाडय़ा रुळावरून घसरून झालेल्या अपघातात २९ प्रवासी ठार झाले. मंगळवारी रात्री खंडवा-इटारसी भागातील खिरकियां व भिरंगी या दोन स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली. अतिवृष्टीमुळे रुळांखालील भराव वाहून गेल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा रेल्वेतर्फे करण्यात आली आहे.

हर्दा जिल्ह्य़ाला गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. परिणामी या ठिकाणच्या नद्यांना पूर आला आहे. याच जिल्ह्य़ातील खिरकियां व भिरंगी या दरम्यान छोटा पूल लागतो. येथील रुळांखालील भराव पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने जमीन भुसभुशीत झाली होती. मंगळवारी रात्री या मार्गावरून मुंबईहून वाराणसीकडे जाणारी कामायनी एक्स्प्रेस व पाटण्याहून मुंबईकडे येणारी जनता एक्स्प्रेस या दोन्ही गाडय़ा आल्या. काही क्षणांतच दोन्ही गाडय़ा रुळावरून घसरल्या. दोन्ही गाडय़ांचे मिळून २१ डबे रुळावरून घसरले. त्यातील काही नदीत पडले तर काही लोंबकळले. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. अपघातात २९ प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यात १३ पुरूष, ११ महिला व पाच मुलांचा समावेश आहे. या अपघातातून २५० प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले.

दरम्यान, ज्या भागात हा अपघात झाला तो भाग अपघातप्रवण नव्हता असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. या अपघाताची चौकशी करण्यात येईल अशी माहिती रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दिली. कामायनी व जनता एक्स्प्रेस या दोन्ही गाडय़ा या मार्गावरून जाण्याआधी अवघ्या आठ मिनिटांपूर्वी एक गाडी पुलावरून गेली होती. त्या गाडीच्या चालकाने कोणताही धोक्याचा इशारा दिला नव्हता, असेही रेल्वे प्रशासनाने नमूद केले.

मृतांच्या आकडय़ावरून गोंधळ

अपघातातील मृतांच्या आकडय़ावरून गोंधळ निर्माण झाला होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यसभेत अपघाताची माहिती देताना मृतांची संख्या १२ असल्याचे सांगितले. तर रेल्वे प्रशासनानेही मृतांचा आकडा १२ असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, घटनास्थळाची पाहणी करणारे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांची संख्या २५ असल्याचे स्पष्ट केले.

मात्र, अखेरीस या अपघातात २९ जण ठार झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त  केले आहे.

 

सकृतदर्शनी तरी हा अपघात अतिवृष्टीमुळे रुळाखालील भराव वाहून गेल्याने झाल्याचे निदर्शनास येत आहे. अधिक चौकशीनंतरच अपघातामागील सत्य समोर येईल.

-सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री

 

मालेगावच्या महिलेचा मृत्यू

अपघातातील मृतांमध्ये मालेगाव तालुक्यातील टेहेरे येथील मथुराबाई शेवाळे (५७) यांचा समावेश आहे. काशी, प्रयाग तीर्थयात्रेसाठी निघालेल्या मालेगाव व सटाणा तालुक्यांतील सुमारे १५० भाविकांनी मध्य प्रदेशात झालेल्या रेल्वे अपघातामुळे यात्रेचा बेत रद्द करून परतीचा मार्ग धरला आहे. तीन खासगी गाडय़ांमधून या भाविकांना परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.