चेन्नई : तीव्र पाणीटंचाई असलेल्या चेन्नई शहरासाठी २५ लाख लिटर पाणी घेऊन एक रेल्वेगाडी येथे दाखल झाली आहे. गेले काही महिने चेन्नईला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. चेन्नईचा पाणी प्रश्न आता जागतिक पातळीवर पोहोचला असून समाजमाध्यमांवर अनेक नामवंतांनी त्यावर चिंता व्यक्त केली होती.

पन्नास डब्यांची रेल्वेगाडी तामिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्य़ातील जोलारपेट्टी येथून पाणी घेऊन आली. प्रत्येक डब्यात पन्नास हजार लिटर पाणी आहे. शुक्रवारी दुपारी ही गाडी इंटिग्रल कोच  फॅक्टरी येथे दाखल झाली असून तेथे पाणी भरण्याचे केंद्र आहे. रेल्वेमार्गावर १०० पाइप टाकण्यात आले असून हे पाणी त्यांच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यासाठी पाठवले जाणार आहे, अशी माहिती चेन्नई महानगर पाणीपुरवठा व सांडपाणी  विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते वितरित केले जाणार असून पुढील सहा महिन्यांपर्यंत पाण्याची गरज भागवण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. चेन्नईत ईशान्य मान्सूनचा पाऊस पडण्यास सहा महिने अवकाश आहे. त्यामुळे तोपर्यंत  तेथे पाणी पुरवणे कठीण आहे. ही गाडी पाणी घेऊन गुरुवारीच येणार होती पण जोलारपेट्टी या २१७ कि.मी. दूर असणाऱ्या ठिकाणापासून पाणी आणताना व्हॉल्वमध्ये गळती झाली होती, त्यामुळे ही गाडी  शुक्रवारी दुपारी येथे आली आहे. हे पाणी आणण्याची व्यवस्था करण्यासाठी वीस दिवस लागले आहेत. तामिळनाडूच्या मंत्र्यांच्या हस्ते या पाणीपुरवठा व्यवस्थेचे उद्घाटन  होणार आहे.

चेन्नईतील पाणीटंचाई : गेले काही महिने चेन्नईत पाणीटंचाई असून दक्षिणेकडील या महानगरात रोजचा पाण्याचा तुटवडा २०० दशलक्ष लिटरचा आहे. एकूण चार धरणे चेन्नईला पाणी पुरवतात, पण ती कोरडी पडली आहेत. तामिळनाडू सरकारने या आधी रेल्वेमार्फत पाणी पुरवण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी सांगितले,की चेन्नईचे पाणीसंकट दूर करण्यासाठी जोलारपट्टी येथून ६५ कोटी रूपये खर्च करून पाणी आणले आहे.