करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउन सुरु झाल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल झाले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांनी चालत आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्याने मागील जवळजवळ दोन महिन्यांपासून देशातील अनेक राज्यांमधून मजूर चालत आपल्या राज्यांमध्ये परत जाताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या लॉकडाउनमध्ये श्रमिक विशेष ट्रेन्सच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची सुविधा देण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक श्रमिकांना आपल्या राज्यात जाण्यात अडचणी येत आहेत. श्रमिक विशेष ट्रेन मार्ग चुकत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. याच गोंधळावरुन राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि देशाचे माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी रेल्वेच्या कारभारावर खास त्यांच्या शैलीत ट्विटवरुन टोला लगावला आहे.

बिहारचे माजी उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारला येणारे ट्रेन पश्चिम बंगालला गेल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारे ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी, “बिहारमधील पाटण्याला येण्यासाठी निघालेली ट्रेन पश्चिम बंगालमधील पुरुलियाला पोहचली. डिजीटल भारतामध्ये असं का होत आहे याबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावं. गरिबांकडून तिकीटांचे पैसे घेतले. त्यांना २४ ते ३० तासाच्या प्रवासामध्ये पाणी आणि खाण्याचे पदार्थही दिले जात नाही आणि आता हा असा गोंधळ. याहून त्यांचा अधिक अपमान करण्याची एखादी कृती शिल्लक राहिली आहे का?” असं ट्विट केलं होतं.

तेजस्वी यादव यांच्या या ट्विटवर त्यांचे वडील म्हणजेच लालू प्रसाद यादव यांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी यांचे ट्विट रिट्विट करताना कोट करुन, “रेल्वेगाड्या जरा जास्तच आत्मनिर्भर झाल्या आहेत,” असं म्हटलं आहे.


लालू यांचे हे ट्विट तेराशेहून अधिक जणांनी रिट्विट तर सहा हजार ९०० हून अधिक जणांनी लाइक केलं आहे. बिहारला जाणारी ट्रेन पश्चिम बंगालला गेल्यावरुन लालू यांनी ही प्रतिक्रिया दिली असली तरी मागील काही दिवसांमध्ये अशाप्रकारे नियोजित स्थानकाऐवजी दुसरीकडेच रेल्वे गेल्याची ही काही पहिलीच घटना नाही. गुरूवारी (२१ मे २०२० रोजी) महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपुर या ठिकाणी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर ओडिशामध्ये पोहोचली होती.