देशात करोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर, इंजेक्शन, लस आदींचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. परिणामी रूग्णांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी रूग्णालयांमध्ये जागाच उरलेली नसल्याने, रूग्णांची व्यवस्था उपलब्ध होतील त्या अन्य ठिकाणी केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे व ट्विटमुळे सदैव चर्चेत राहणारे भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज भाजपाला एक सल्ला दिला आहे.

”करोना महामारीमुळे सर्वत्र निर्माण होत असलेली परिस्थिती पाहता, मी सुचवतो की दिल्लीतील आठ मजली पक्ष कार्यालयाच्या इमारतीमधील वरील सहा मजले रूग्णालायत रूपांतरित केले जावेत. भाजपाकडे अद्यापही अशोका रोडवरील शासकीय बंगल्यातील जुने कार्यालयं आहेत, ज्यांचा पक्षाच्या कामासाठी वापर केला जाऊ शकतो.” असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.

या अगोदर सुब्रमण्यम स्वामींनी, नरेंद्र मोदींमुळे देशावर करोनाचे संकट ओढावले असून त्यामुळे देश आता अक्षरश: गुडघ्यांवर आलाय अशा मथळ्याखालील लेखाची लिंक शेअर करत पंतप्रधान कार्यालयावर निशाणा साधाल्याचे दिसून आले आहे.. “फेक ट्विटर आयडी बनवून हलकट व्यक्तींवर पैसे वाया घालवण्यापेक्षा पंतप्रधान कार्यालयाने अशाप्रकारच्या टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे,” असं स्वामी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

“फेक ट्विटर आयडी बनवून हलकट व्यक्तींवर पैसे वाया घालवण्यापेक्षा…”; भाजपा खासदाराचा खोचक सल्ला

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशामध्ये थैमान घातलं असून सर्वच स्तरांमधून करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातील केंद्र सरकारचा अंदाज चुकल्याची टीका केली जात आहे. केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारने योग्य पद्धतीने व्यवस्थापन न केल्याने देशातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, औषध आणि लसींचा तुटवडा जाणवत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयाच्या कामावर नाराजी व्यक्त करत नितीन गडकरींच्या हाती करोना लढाईची सर्व सुत्रं सोपवण्यात यावीत अशी मागणी केली होती.

“पंतप्रधान कार्यालय काही कामाचं नाही, करोनाविरुद्धच्या लढ्याचं नेतृत्व गडकरींकडे द्या”; भाजपा खासदाराची मागणी

“ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणं आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या करोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचं ठरणार नाही,” असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.