देशातील ६५ टक्के लोकसंख्या आजही ग्रामीण भागात कार्यरत असून त्यांच्यासह संपूर्ण देशाच्या अन्न सुरक्षेसाठी कृषीक्षेत्राचा कायापालट करणे याला देशाच्या धोरणांमध्ये सर्वोच्च प्राधान्य असेल, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी गुरुवारी सांगितले. चालू वर्षांसाठी देशाचे विज्ञान, तंत्रज्ञान व नवरचना धोरण जाहीर करताना भारत २०२०पर्यंत जगातील अव्वल पाच विज्ञानशक्तींच्या पंक्तीत असेल, असा विश्वासही व्यक्त केला.
१००व्या सायन्स काँग्रेसच्या उद्घाटन सोहोळ्यास ते संबोधित होते. स्वातंत्र्योत्तर भारतात सायन्स काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच या परीषदेचे उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी केले आहे. राष्ट्रपतींनी केलेल्या उद्घाटनपर भाषणात कल्पकतेस तसेच विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन निर्माण करण्यास चालना देणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रपतींनी व्यक्त केले.
आपल्या भाषणांत पंतप्रधानांनी जनुकीय विकसित तंत्रज्ञान, अणुऊर्जा किंवा अंतराळातील संशोधन यांसारखे गुंतागुंतीचे विषय केवळ श्रद्धा, भावना आणि भीती यांच्या आधारावर सोडवता येणार नाही. त्यासाठी रचनात्मक चर्चेची आवश्यकता आहे, असे मत मांडले. आपल्या प्रमुख विज्ञानक्षमतेप्रमाणेच या मुद्दय़ांकडेही वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जाणिवेतून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशातील ६५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात कार्यरत असल्याकडे लक्ष वेधत ते म्हणाले, ‘बाराव्या पंचवार्षिक योजनेने कृषीक्षेत्रात ४ टक्के वार्षिक विकासदराचे लक्ष्य ठेवले असून देशाच्या अन्नसुरक्षेसाठी ते अत्यावश्यक आहे. त्यामुळेच कृषीक्षेत्रात कायापालट झाला पाहिजे. पाणी आणि जमिनीचा अभाव या गोष्टींमुळे कृषीविकासाला खीळ बसली असून आपल्याला जलसंवर्धन आणि शेतजमिनीची उत्पादकता वाढवणाऱ्या तंत्रज्ञानात नवे संशोधन करण्याची गरज आहे.’ शेतीशिवाय ऊर्जासुरक्षा, मलनिस्सारण आणि स्वच्छ पाणीपुरवठा या क्षेत्रांत अधिक संशोधनाची गरजही त्यांनी व्यक्त केली.
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती विविध स्रोतांच्या पूर्ण क्षमतेनिशी वापरासाठी महत्त्वाच्या आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. गरीब आणि श्रीमंतातील दरी कमी करण्यासाठी आणि वंचित घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विविध साधनांचा वापर केला गेला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी तरुण पिढीने विज्ञानावर आधारित व्यवस्था स्वीकारली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
भारतीय शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणारी आणि कल्पकतेला चालना देणारी असावी असे मत भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी व्यक्त केले. १००व्या सायन्स काँग्रेसचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सी.व्ही.रामन यांच्यानंतर भारताला शास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक आजवर मिळालेले नाही. ही बाब लक्षांत घेता यापुढे वैज्ञानिकांनी नोबेल मिळवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी नोंदविले. प्राचीन भारतात नालंदा-तक्षशिला यासारखी विद्यापीठे ज्ञानाधिष्ठित तसेच मूल्याधिष्ठित समाज निर्माण करीत होती, याची आठवण करून देतानाच कृषी,उत्पादकता आणि मूल्यव्यवस्था याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. भारतात विज्ञाननिष्ठ वातावरण निर्माण करतानाच त्याचा वापर शांतता आणि भरभराटीसाठी केला जाईल हे पहाणेही आवश्यक आहे, असेही मुखर्जी यांनी सुचविले. जागतिक अर्थव्यवस्थेत आपले मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी कल्पकतेला चालना देणे – कल्पकतेस पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याची बाबही आपल्या उद्घाटनाच्या भाषणादरम्यान प्रणब मुखर्जी यांनी अधोरेखित केली.