सोनियांचे पंतप्रधानांना पत्र

म्युकरमायकोसिसवरील (काळी बुरशी) उपचारांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा पुरवठा केला जाईल याची काळजी घ्यावी आणि या विकाराने बाधित असलेल्या रुग्णांवर विनामूल्य उपचार करावेत, अशी मागणी शनिवारी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

काळी बुरशी हा आजार आयुष्मान भारत आणि अन्य आरोग्य विमा योजनेअंतर्गत नाही, असे सोनिया गांधी यांनी निदर्शनास आणून दिले असून या प्रश्नावर तातडीने कृती करावी, अशी मागणीही गांधी यांनी पत्रामध्ये केली आहे. म्युकरमायकोसिसला साथरोग विकार कायद्यान्वये अधिसूचित करावे, अशी सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना केली आहे. त्यामुळे त्यावरील उपचारांसाठी अत्यावश्यक असलेल्या औषधांचे पुरेसे उत्पादन आणि पुरवठा झाला पाहिजे आणि त्यावरील उपचार विनामूल्य झाले पाहिजेत, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

म्युकरमायकोसिसवरील उपचारांसाठी लिपोसोमल अ‍ॅम्फोटेरिसीन-बी हे औषध अत्यावश्यक असल्याचे आपल्याला सांगण्यात आले आहे. मात्र बाजारात या औषधांचा तुटवडा असल्याचे समजले, असे गांधी यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे या विकाराचा आयुष्मान भारत आणि अन्य आरोग्य विमा योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्याबाबत तातडीने कृती करावी, अशी विनंती आपण करीत आहोत, असेही सोनियांनी म्हटले आहे.

देशात काळ्या बुरशीची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यामुळे काही जणांचा मृत्यूही झाला आहे, त्या पाश्र्वाभूमीवर सोनिया यांनी नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे वरील विनंती केली आहे. यापूर्वी गुरुवारी सोनिया यांनी मोदी यांना एक पत्र लिहिले होते त्यामध्ये करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती.

मध्य प्रदेशात अधिसूचित रोग घोषित

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी हा राज्यात अधिसूचित रोग म्हणून जाहीर केला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने शुक्रवारी एक आदेश जारी केला. त्यानुसार, साथरोग कायदा आणि मध्य प्रदेश सार्वजनिक आरोग्य कायदा यांच्यातील तरतुदींखाली काळी बुरशी या रोगाला अधिसूचित करण्यात आले आहे.