जामीनावर सुटून बाहेर आलेल्या आदिवासी कार्यकर्त्या सोनी सुरी आणि इन्फोसिस कंपनीच्या संचालक मंडळातील माजी सदस्य व्ही. बाला यांनी ‘आम आदमी पक्षा’त प्रवेश केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सोनी सुरी या जामीनावर सुटून बाहेर आल्या आहेत. सोनी सुरींवर नक्षलवाद्यांसाठी खंडणी गोळा केल्याचा आरोप आहे. मला राजकारणात काडीमात्र रस नव्हता. मला एक सामान्य जीवन जगायचे होते. मात्र, पोलिसांच्या ताब्यात असताना करण्यात आलेल्या मानसिक छळामुळे जीवनाकडे बघण्याचा माझा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून गेला. त्यामुळे मला आता व्यवस्थेत सुधारणा आणायची असून, त्यासाठी ‘आप’च्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे सोनी सुरी यांनी ‘आम आदमी पक्षा’च्या फेसबुक पेजवर जाहीर केले. दुसरीकडे सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणा-या इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी व्ही.बाला यांनीसुद्धा ‘आम आदमी पक्षा’त प्रवेश केला आहे.