टाटा स्टील कंपनीने चार वर्षांपूर्वी ट्रायबल कल्चरल सोसायटीची स्थापना करून झारखंड, ओरिसा, आसाम, बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या संताली आणि हो भाषांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाला आदिवासी जनतेकडून उत्तम प्रतिसाद लाभला असून झारखंडमध्ये तब्बल एक हजार आदिवासी शिक्षक तयार झाले आहेत.
भाषांच्या जतन-संवर्धनासाठी संताली भाषेच्या ओल-चिकी आणि हो भाषेच्या वारंग चिती या लिपीचा अभ्यास, जतन आणि संवर्धन करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. आदिवासी जनता मोठय़ा संख्येने राहत असलेल्या कोल्हान प्रदेशात या लिपींच्या संवर्धनासाठी १५ केंद्रे सुरू करण्यात आली. कोल्हान प्रदेशामध्ये पूर्व व पश्चिम सिंघभूम आणि सराईकेला खरसावाँ या जिल्ह्य़ांचा समावेश आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पाला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद लाभल्याची माहिती टाटा स्टीलचे कॉपरेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी विभागाचे प्रमुख बिरेन भूता यांनी दिली.
आदिवासींकडून चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर संताली आणि हो भाषा केंद्रांची संख्या दीडशेहून अधिक वाढवण्यात आली आहे. ‘एटे पिटका टूरटूंग आखरा’, ‘झिकपानी’ (पश्चिम सिंघभूम) आणि ‘आदिवासी हो महासभा’ या आदिवासी जमातींच्या संघटनांशी समन्वय साधून हे प्रकल्प चालविण्यात येत आहेत. आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत १ हजार शिक्षक तयार करण्यात आले असून ते या आदिवासी भाषा त्या त्या जमातींच्या लोकांना शिकवितात. या केंद्रांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीही केली जात असून सोसायटीने प्रत्येक केंद्रासाठी एक शिक्षक आणि एक साहाय्यक शिक्षक अशा नेमणुका केल्या आहेत.  
हो भाषेची लिपी ‘वारंग चिती’चे संस्थापक लोको बोद्रा यांचे प्राचीन घर दोन वर्षांपूर्वी म्युझियममध्ये रूपांतरित करण्यात आले असून ‘ओल-चिकी’ लिपीचे संस्थापक पं. रघुनाथ मुरमू यांचे ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्य़ातील दानबोसी गावातील दफनभूमीचे ठिकाण जतन केले जाणार आहे. पारंपरिक आदिवासी खेळ असलेले सेक्कोर, काती, बहू-चोर आणि छूर यांचेही पुनरुज्जीवन करण्यासाठी ट्रायबल कल्चरल सोसायटी पुढाकार घेणार आहे. त्याचबरोबर ओरिसामधील जाजपूर येथेही तेथील आदिवासी गटांच्या मागणीनुसार संताली भाषेच्या लिपीचे केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती भूता यांनी दिली.