अंदमान-निकोबार येथे अमेरिकन नागरिक जॉन अॅलन चाऊची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी चाऊचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हातात धनुष्य-बाण घेतलेल्या आदिवासींना सामोरे जावे लागले. आदिवासींच्या हातातील धनुष्य पाहून पोलीस पथकाला आल्या पावली परतावे लागले. तरीसुद्धा यानंतरही चाऊच्या मृतदेहाचा शोध सुरु ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाच आता आदिवसी हक्कांचे संरक्षण करणाऱ्या ‘सर्व्हायव्हल इंटरनॅशनल’ या संस्थेने चाऊच्या मृतदेहाचा शोध घेऊ नये अशी विनंती करणारे पत्रकच जारी केले आहे. चाऊच्या मृतदेहाचा शोध घेणे हे शोधकर्त्यांना तसेच बेटांवरील संथाली लोकांसाठी धोकादायक ठरु शकते असे मत या संस्थेने व्यक्त केले आहे.

‘सर्व्हायव्हल इंटरनॅशनल’चे संचालक स्टीफन कोरी यांनी संस्थेच्यावतीने एक परिपत्रकच जारी केले आहे. चाऊच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे प्रयत्न भारतीय पोलिसांनी बंद करावेत अशी आम्ही विनंती करतो. अशाप्रकारचा कोणताही प्रयत्न शोधपथकातील अधिकाऱ्यांसाठी तसेच संथाली लोकांसाठी धोकादायक ठरु शकतो. त्या बेटावर इतर कोणी जाण्याने तिथेल संरक्षित जामातीमधील संथाली लोकांना नवीन रोगांचा प्रदूर्भाव होऊ शकतो अशीही भिती कोरी यांनी लिहीलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.

याआधी अशाप्रकारे संथाली लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी त्यांनी ताकदीचा वापर करुन आपल्या जमीनीवरून बाहेरील लोकांना शक्तीचा वापर करुन पळवून लावले होते अशी आठवणही या पत्रात भारतीय अधिकाऱ्यांना करुन देण्यात आली आहे. चाऊचा मृतदेह आणि संथालींना एकटे सोडून द्यायला हवे अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. मृतदेहाच्या शोधासाठी नियम मोडून संरक्षित बेटांवर जाणे चुकीचे ठरले. त्याऐवजी मृतदेहाचा शोध न घेता यापुढे असे प्रकार होणार नाही यासाठी आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळले जावेत अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे.

पोलीस परतले…

शनिवारी चाऊचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी हातात धनुष्य-बाण घेतलेल्या आदिवासींना पाहून माघात घेतली होती. स्थानिक पोलीस प्रमुख दीपेंद्र पाठक यांनी यासंदर्भात माहिती दिली. शनिवारी उत्तर संथाली बेटाकडे रवाना झालेल्या पथकाला तिथे काही आदिवासी दिसले. त्याच भागात चाऊ अखेरचा दिसला होता. किनाऱ्यापासून ४०० मीटर दूर समुद्रात बोटीत बसलेल्या जवानांनी दुर्बिणमधून पाहिले असता ते आदिवासी धनुष्य-बाण घेऊन उभे होते. आदिवासींचा तो पवित्रा पाहून पोलीस पथक पुन्हा माघारी फिरल्याचे पाठक यांनी सांगितले. चाऊ हा आदिवासींना ख्रिश्चन धर्माबाबत काही सांगत होता. त्याचवेळी आदिवासींनी त्याची हत्या केली होती. पोलीस हे संथाली बेटावरील लोकांबरोबर संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजते. दि. १७ नोव्हेंबर रोजी चाऊचा मृत्यू झाला होता. अद्यापपर्यंत त्याचा मृतदेह मिळालेला नाही. चाऊला आदिवासींनी बेटावरच दफन केले असल्याचे काही मासेमाऱ्यांचे म्हणणे आहे.