News Flash

पश्चिम बंगालमध्ये ७९.७९, तर आसाममध्ये ७७ टक्के मतदान

आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या ४७ मतदारसंघांपैकी ३५ ठिकाणी भाजपचे आमदार आहेत.

तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील टोकाच्या संघर्षामुळे देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७९.७९ टक्के मतदान झाले. भाजप सत्ताधारी असलेल्या आसाममध्ये पहिल्या टप्प्यात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात ३० मतदारसंघांत मतदान झाले आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यात ४७ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान काही ठिकाणी तुरळक हिंसक घटना घडल्या.

पश्चिम बंगालमध्ये ज्या ३० मतदारसंघांत मतदान पार पडले तेथील २६ जागांवर सध्या तृणमूलचे आमदार आहेत. तसेच ३० पैकी बहुसंख्य मतदारसंघ एके काळी जंगलमहल क्षेत्रातील नक्षलग्रस्त भाग होते. या ३० मतदारसंघांपैकी नऊ मतदारसंघ पुरुलिया जिल्ह्यातील असून बांकुरा आणि झारग्राम (प्रत्येकी चार मतदारसंघ), पश्चिम मेदिनीपूरमधील सहा आणि पूर्व मेदिनीपूरमधील सात मतदारसंघांचा समावेश आहे.

आसाममध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या ४७ मतदारसंघांपैकी ३५ ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. आसाममध्ये सर्बनंदा सोनोवाल, रिपून बोरा आणि विधानसभाध्यक्ष हितेंद्रनाथ गोस्वामी या मातबर उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले.

पश्चिम बंगालमध्ये करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2021 2:15 am

Web Title: trinamool congress bjp west bengal assembly elections in the first phase of voting akp 94
Next Stories
1 मेहबूबा मुफ्ती यांच्या कार्यकाळातील मुख्यमंत्री निधीची चौकशी
2 तृणमूल उमेदवाराने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
3 राष्ट्रपती कोविंद यांच्यावर मंगळवारी हृदय शस्त्रक्रिया
Just Now!
X