नंदीग्राममधील निवडणूक प्रचारादरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरल्याबद्दल तृणमूल काँग्रेसने गुरुवारी निवडणूक आयोगावर टीका केली. निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सध्या निवडणूक आयोगावर असल्यामुळे तो ही जबाबदारी टाळू शकत नाही, असे पक्षाने सांगितले.

हा हल्ला म्हणजे ‘तृणमूलच्या सर्वोच्च नेत्याचा जीव घेण्यासाठीचा कट होता’, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. भाजपने हिंसाचार घडवून आणण्यासाठी शेजारच्या राज्यांतून समाजकंटकांना नंदीग्राममध्ये आणले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणूक आयोग भाजप नेत्यांच्या ‘आदेशानुसार’ काम करत असल्याचा आरोप तृणमूलच्या शिष्टमंडळाने आयोगाच्या अधिकाºयांची भेट घेतल्यानंतर केला. बॅनर्जी यांच्यावर हल्ला होऊ शकतो याची कल्पना असतानाही निवडणूक आयोगाने काहीच केले नाही, असाही त्यांचा आरोप होता.

भाजपच्या एका प्रतिनिधी मंडळानेही निवडणूक आयोगाच्या अधिकाºयांची भेट घेतली आणि नंदीग्राम येथे बनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्याचा सखोल तपास करण्याची मागणी केली.

‘बंगालमधील कायदा- सुव्यवस्था स्थिती चांगली होती, मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था ही निवडणूक आयोगाची जबाबदारी झाली आहे. आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना हटवले आणि दुसऱ्याच दिवशी ममतांवर हल्ला झाला’, असे तृणमूलचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी म्हणाले. सध्या प्रशासन आयोगाच्या हाती असल्यामुळे त्यांनाच या हल्ल्याची जबाबदारी घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना दुखापत

ममता बॅनर्जी यांच्या बुधवारी रात्री उशिरा प्राथमिक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या त्यामधून त्यांच्या डाव्या पायाच्या घोट्याच्या हाडाला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याचे आढळले आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या उजव्या खांद्याला, हाताला आणि मानेला दुखापत झाल्याचे आढळले आहे, असे एसएसकेएममधील एका ज्येष्ठ डॉक्टरने सांगितले. नंदिग्राम येथील कथित हल्ल्यानंतर छातीत दुखत असून त्यांना श्वासनाचाही त्रास होत असल्याचे म्हटले आहेत.