नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला (आप) पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच नव्हे आपच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबतचा व्हिडीओ तृणमूलचे राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओ ब्रायन यांनी गुरुवारी जारी केला आहे.

गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत केजरीवाल यांनी ममतांना पाठिंबा दिला होता, इतकेच नव्हे तर कोलकाताचे पोलीस प्रमुख राजीवकुमार यांच्यावरून ममतांचा केंद्राशी संघर्ष झाला तेव्हाही केजरीवाल यांनी ममतांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे काही वर्षांपासून दोन्ही नेत्यांमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला होता त्याचा ममता यांनी निषेध केला होता आणि या प्रश्नावरून भाजपवर ताशेरे ओढले होते. ‘आप’ला, त्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदान करा, असे ट्वीट डेरेक ओ ब्रायन यांनी केले आहे. आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, वीज आणि प्रदूषणाची समस्या या बाबत केजरीवाल सरकारने जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता झाली आहे’, असे  त्यांनी म्हटले आहे.

मी दहशतवादी, की दिल्लीचा सुपुत्र हे जनता ठरवेल – केजरीवाल

नवी दिल्ली : आपण दिल्लीचे सुपुत्र आहोत, भाऊ आहोत की दहशतवादी आहोत हे दिल्लीतील जनता ठरवेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे सांगितले. हा निर्णय आपण दिल्लीतील जनतेवर सोपवत आहोत, असे त्यांनी येथे वार्ताहरांना सांगितले. भाजपच्या एका नेत्याने निवडणूक प्रचार सभेत केजरीवाल यांना दहशतवादी संबोधले होते, त्यावर केजरीवाल यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. आपण देशासाठी आयुष्य वेचले आहे, मधुमेहाचा विकार असतानाही आपण भ्रष्टाचाविरुद्ध उपोषण केले आहे, असेही ते म्हणाले.