News Flash

तृणमूल काँग्रेसचा निर्विवाद विजय

निकालाची उत्कंठा वाढवणाऱ्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मात्र ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला.

(पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत रविवारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. त्यानंतर कोलकात्यात पक्ष कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

 

दोनशेपेक्षा जास्त जागा; भाजपला रोखले

नवी दिल्ली :अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा एकतर्फी पराभव करून तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा निर्विवाद यश मिळवले. २९४ जागांच्या विधानसभेत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार २१५ जागांवर आघाडीवर होते, तर भाजपला जेमतेम ७६ जागांवर विजयाची आशा होती. डावे पक्ष व काँग्रेसच्या संयुक्त मोर्चाचे सर्वच्या सर्व उमेदवार पिछाडीवर होते.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी हा ‘लोकशाहीचा विजय’ असल्याचे म्हटले आहे. करोनामुळे शपथविधी अत्यंत साधेपणाने केला जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी रविवारी निकालांचा कल स्पष्ट झाल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.

निकालाची उत्कंठा वाढवणाऱ्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मात्र ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागला. बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश करणारे ममतांचे पूर्वाश्रमीचे सहकारी सुवेंदू अधिकारी यांच्यावर ममतांना मात करता आली नाही. ‘‘नंदीग्राममधील माझ्या पराभवाची चिंता करू नका. तिथे संघर्ष करावा लागला कारण मी (भाजपविरोधात) एक मोहीमच लढवत होते. नंदीग्रामचा निकाल काहीही लागो. तिथल्या मतदारांनी कोणालाही कौल दिला तरी मी स्वीकारेन. आपण पश्चिम बंगालमधील लढाई जिंकलो आहोत, भाजपला पराभूत केले आहे’’, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या विजयाचा आनंद व्यक्त केला.

२०११ मध्ये तृणमूल काँग्रेसने ३४ वर्षे सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांच्या सरकारचा पराभव केला होता व १८४ जागा मिळवून पहिल्यांदा पश्चिम बंगालची सत्ता ताब्यात घेतली होती. २०१६ मध्ये तृणमूल काँग्रेसने सत्ता राखत विक्रमी २११ जागा जिंकल्या होत्या. या वेळी २०२१ मध्ये देखील ममता बॅनर्जी यांचा पक्ष जागांचे द्विशतक करेल, असे चित्र रात्री उशिरापर्यंत आलेले निकालांचे कल स्पष्ट करत आहेत. करोनामुळे दोन उमेदवारांचा मृत्यू झाल्याने २९२ जागांसाठी मतदान झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच भाजपच्या अन्य नेत्यांनी झंझावाती प्रचार करूनदेखील पश्चिम बंगालच्या मतदारांनी तृणमूल काँग्रेसच्या बाजूने निर्णायक कौल दिला. २०१६ च्या निवडणुकीत भाजपला ३ जागा मिळाल्या होत्या .

राज्याचा वेगाने विकास -ममता

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयाने देशाला भाजपपासून वाचवले आहे. तृणमूलला २०० हून जास्त जागा मिळतील. या निकालाने भाजपच्या आत्मप्रौढी धुळीला मिळाली आहे, असे ममता बॅनर्जी पत्रकार परिषदेत म्हणाल्या.  हा बंगालचा विजय असून आपण इथली संस्कृती-परंपरा वाचवण्यात यशस्वी झालो आहोत, असे ममतांनी नमूद केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:29 am

Web Title: trinamool congress undisputed victory akp 94
Next Stories
1 डावे-काँग्रेस आघाडीला धोबीपछाड
2 निवडणूक व्यवस्थापनातून प्रशांत किशोर यांचा संन्यास!
3 आसाममध्ये पुन्हा भाजपची सत्ता
Just Now!
X