रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा दावा

पश्चिम बंगालमधील जनतेने त्यांच्या हक्काच्या नेत्याला पुन्हा सत्तेवर आणण्याची तयारी केली असल्याने राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसचेच सरकार सत्तारूढ होणार असल्याचा विश्वास निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शनिवारी व्यक्त केला.

प्रशांत किशोर यांचे आय-पीएसी पथक तृणमूलच्या निवडणूक प्रचाराची योजना आखत आहे. देशातील लोकशाहीसाठीचा एक महत्त्वाचा लढा पश्चिम बंगालमध्ये लढला जाणार आहे, असे ट्वीट किशोर यांनी केले आहे. राज्यातील जनतेला त्यांची कन्या पुन्हा एकदा सत्तेवर यावयास हवी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आय-पीएसीच्या संकल्पनेतून गेल्या आठवड्यात तृणमूलने ‘बंगालमधील जनतेला त्यांची कन्याच हवी आहे’ अशा आशयाची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला दोन आकडी संख्या गाठता आली तर ट्विटर सोडून देण्याची घोषणाही किशोर यांनी डिसेंबर महिन्यात केली होती. तथापि, भाजपने त्यांची खिल्ली उडवली आणि किशोर यांना बंगालमधील वस्तुस्थितीची जाणीव नसल्याचे म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २००हून अधिक जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य असल्याचे म्हटले होते त्याला प्रतिसाद देताना किशोर यांनी दोन आकडी संख्येबाबतचे ट्वीट केले होते.

आघाडीची आज कोलकातामध्ये सभा

डावे पक्ष, काँग्रेस आणि इंडियन सेक्युलर फ्रण्ट (आयएसएफ) आघाडीची जाहीर सभा रविवारी कोलकातामधील ब्रिगेड परेड ग्राउण्डवर आयोजित करण्यात आली असून त्याद्वारे ही आघाडी पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करणार आहे.माकपच्या नेतृत्वाखालील डावी आघाडी आणि काँग्रेस यांच्यात यापूर्वीच जागावाटपाबाबत समझोता झाला आहे. त्याचप्रमाणे डावे पक्ष आणि पीरजादा अब्बास सिद्दिकींच्या आयएसएफ यांच्यातील जागावाटपही पूर्ण झाले आहे. काँग्रेस आणि आयएसएफ यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे.

रविवारी  जाहीर सभेने प्रचाराची सुरुवात केली जाणार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.