News Flash

माझ्यावर पाळत ठेवली जातेय; मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या तृणमूल खासदाराचा गौप्यस्फोट

दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना दिलं पत्र

अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी लॉकडाऊन ते न्यायव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. कोणतीही मागणी केलेली नसताना घरासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असं मोईत्रा यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे.

मोईत्रा यांनी लोकसभेत बोलताना न्यायव्यवस्थेच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी माजी सरन्यायाधीशांच्या लैंगिक गैरवर्तन प्रकरणाचाही उल्लेख केला होता. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. दरम्यान आज मोईत्रा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्त आणि बाराखंबा पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना पत्र दिलं आहे.

पश्चिम बंगालमधील कृष्णनगरच्या खासदार असलेल्या मोईत्रा यांनी त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिसांचा फोटो ट्विट केला आहे.

आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

मोईत्रा यांनी आता दिल्लीच्या पोलिस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव आणि बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे एसएचओ यांच्याकडे आपल्या घराबाहेर तैनात असलेली सुरक्षा हटवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

या पत्रात मोईत्रा यांनी दावा केला आहे की बाराखंबा रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी (एसएचओ) शुक्रवारी त्यांना दिल्लीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी भेटले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाचे ३ सशस्त्र जवान त्यांच्या घराच्या बाहेर नेमण्यात आले.

“या सशस्त्र जवानांच्या हालचालींवरन असं दिसत आहे की, ते माझ्या हालचालींच्या नोंदी ठेवत आहेत. यातून मला असं जाणवतंय की मी एक प्रकारच्या पाळतीखाली आहे,” असे महुआ मोईत्रा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. “मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, देशाची नागरिक म्हणून राइट टू प्रायव्हसी मला दिलेला मूलभूत हक्क आहे,” असं सांगत मोईत्रा यांनी सुरक्षा काढून घेण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2021 7:23 pm

Web Title: trinamool mp mahua moitra writes to delhi police chief about surveillance
Next Stories
1 “रिंकू शर्माच्या हत्येला अमित शाह जबाबदार, त्यांनी राजीनामा द्यावा”
2 करोना व्हायरसची चौथी लाट?
3 तेजप्रताप यादव ‘राजद’च्याच प्रदेशाध्यक्षांवर संतापले, म्हणाले…
Just Now!
X