तिहेरी तलाकपद्धतीला होणाऱ्या विरोधाची धार आणखी वाढली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांवेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तिहेरी तलाकचा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंचाने या मुद्द्यावर मुस्लिम महिलांचा जबरदस्त पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला आहे. तिहेरी तलाकच्या विरोधात दाखल याचिकेवर १० लाखाहून अधिक मुस्लिमांनी, विशेषतः महिलांनी स्वाक्षऱ्या केल्याचा दावा मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केला आहे. तिहेरी तलाकची पद्धत बंद करण्याचे आवाहन करत मुस्लिमांनी या याचिकेला आपला पाठिंबा दर्शवल्याचे मंचाचे म्हणणे आहे.

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद नवीन नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा मुद्द्यावर जोरदार चर्चा होत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान भाजपने विरोधकांना विशेषतः काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला या मुद्द्यावर आपली बाजू मांडण्यात यावी, असे थेट आव्हानच दिले होते. कुराणातील उल्लेखानुसार, पहिल्यांदा तलाक म्हटल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंत आपल्या निर्णयावर विचार करावा लागतो. त्यानंतर जर आपल्या निर्णयावर ठाम असेल तर दोन वेळा तलाक बोलल्यानंतरच तलाक झाल्याचे मानले जाते. अनेक मुस्लिम देशांमध्ये या पद्धतीवर बंदी आहे. मात्र, भारतात त्यास मान्यता आहे. आरएसएसशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंचाने या पद्धतीविरोधात याचिका दाखल केली आहे. भाजपला उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये मिळालेल्या मोठ्या विजयानंतर या याचिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. तिहेरी तलाकला विरोध केल्यानेच भाजपला मुस्लिम महिलांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यामुळेच मुस्लिम महिलांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केले, असेही सांगितले जात आहे.

दरम्यान, भाजपला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी ३१२ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला ३२५ जागांवर विजय मिळाला आहे. १९८० नंतर उत्तर प्रदेशात सर्वात मोठा विजय मिळवणारा भाजप हा पहिला पक्ष आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेशात २० कोटी लोकसंख्येत १८ टक्के मुस्लिम आहेत. यापूर्वीही अनेक महिलांनी तिहेरी तलाकविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.