लोकसभेत संमत झालेले तिहेरी तलाक विधेयक केंद्र सरकार आज (सोमवार) राज्यसभेत सादर करणार आहे. संसदेत राजकीय वादाचे कारण बनलेल्या या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच तयारी केली आहे. या विधेयकात तिहेरी तलाक देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. हे विधेयक सदनात येण्यापूर्वी संसदीय समितीकडे ते पाठवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तत्पूर्वी भाजपाकडून विजय गोयल यांनी राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक संमत होण्यासाठी सर्व पक्षांशी संपर्क साधला आहे.
काँग्रेस आणि भाजपाने खासदारांना व्हिप जारी केला असून सभागृहात उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर इतर पक्षांनीही खासदारांना या महत्वपूर्ण विधेयक सादर होताना उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. टीडीपीनेही व्हिप बजावले आहे. काँग्रेसने यासंबंधी चर्चेसाठी खासदारांची बैठकही बोलावली आहे. सर्वच पक्ष सभागृहात १०० टक्के उपस्थिती राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
या मुद्यावरून आपली रणनीती ठरवण्यासाठी अनेक विरोधी पक्षांचे राज्यसभा खासदार गुलामनबी आझाद यांच्या चेंबरमध्ये जमणार आहेत. राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नाही आणि विरोधी पक्ष हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. त्यामुळे आज सभागृहात मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद राज्यसभेत विधेयक मांडतील. लोकसभेत २४५ विरुद्ध ११ मतांनी विधेयक मंजूर झाले आहे. विरोधकांनी त्या वेळी सभात्याग केला होता. राज्यसभेत भाजप आणि एनडीएचे संख्याबळ अपुरे आहे. तरी राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळेल, असा दावा प्रसाद यांनी केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 7:49 am