तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक राज्यसभेत बुधवारी चर्चेला येण्याची शक्यता असून तेव्हा या विधेयकात सुधारणा सुचविण्याबाबत आग्रही भूमिका घेऊ नये, अशी विनंती सरकारने मंगळवारी काँग्रेसला केली आहे.

काँग्रेसने लोकसभेत या विधेयकात सुधारणा सुचविण्याचा आग्रह धरला नाही, काँग्रेसने तीच भूमिका घ्यावी, असे सरकारला वाटत असल्याचे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी सांगितले.

काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांसमवेत आपण सातत्याने चर्चा करीत आहोत. लोकसभेत काँग्रेसने कोणत्याही सुधारणेसाठी आग्रह धरला नाही तीच भूमिका राज्यसभेत घ्यावी, असे आम्ही काँग्रेसला सांगितल्याचे अनंतकुमार म्हणाले. काँग्रेसने लोकसभेत काही सुधारणा सुचविल्या होत्या, मात्र त्याबाबत मतदान घेण्याचा आग्रह धरला नाही.

काँग्रेसविरोधी पक्षांशी चर्चा करणार

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाबाबत भूमिका ठरविण्यापूर्वी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षांशी व्यापक चर्चा करणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. लोकसभेत गेल्या आठवडय़ात सदर विधेयक मंजूर करण्यात आले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या नेत्यांची आपल्या दालनात बैठक बोलाविली होती. काँग्रेस पक्ष या विधेयकासाठी अनुकूल असले तरी राज्यसभेतील प्रथेनुसार हे विधेयक निवड समितीकडे पाठविण्याबाबत काँग्रेस आग्रह धरते का, याकडे सर्वाचे लक्ष आहे, असे सूत्रांनी सांगितले.