तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. मात्र हे विधेयक मुस्लिम महिलांना उद्ध्वस्त करणारे विधेयक आहे. त्यांना कमकुवत करणारे आहे तर मुस्लिम पुरुषांना तुरुंगात धाडणारे आहे. या कायद्याचा दुरुपयोग होईल हे लक्षात ठेवा अशी टीका एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विरोधकांनी गदारोळ केला तर काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. या विधेयकाच्या बाजूने २४५ मते पडली तर विरोधात ११ मते पडली. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी या विधेयकाविरोधात सभात्याग केला. आता याच संबंधी ओवेसी यांचेही म्हणणे समोर आले आहे. हे विधेयक मुस्लिम महिलांना उद्ध्वस्त करणारे त्यांना कमकुवत करणारे आहे अशी टीका ओवेसी यांनी केली.

हिंदू माणसाला १ वर्षाची शिक्षेची तरतूद मग मुस्लिम धर्मीयाला ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद का ? असाही प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला. शबरीमला मंदिराबाबत कोर्टाने निर्णय दिला तेव्हा श्रद्धेचा प्रश्न पुढे केला गेला. तुमची श्रद्धा श्रद्धा आहे माझी श्रद्धा नाही? तिहेरी तलाक विधेयकाचा दुरुपयोग जास्त होईल आणि मुस्लिम पुरुषांना तुरुंगात धाडलं जाईल हे लक्षात असूद्यात असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

समलैंगिकता योग्य आहे हे तुम्ही ठरवून टाकलं आहे मग तिहेरी तलाकचे गुन्हेगारीकरण का केले जाते आहे? या कायद्याचा उपयोग मुस्लिम पुरुषांच्या विरोधात केला जाईल. पुरुषाने विवाहबाह्य संबंध ठेवणेही तुम्हाला मान्य आहे मग तिहेरी तलाक गुन्हा का? असाही प्रश्न ओवेसी यांनी विचारला. काँग्रेसनेही या विधेयकावर टीका केली आहे. हे विधेयक मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर मुस्लिम पुरुषांना तुरुंगात डांबण्यासाठी आहे अशी प्रतिक्रिया खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.