त्रिपुरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन लेक्चर्ससाठी मुलीला स्मार्टफोन घेऊन देण्यावरुन झालेल्या वादानंतर एका ५० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शेपाहीजला गावात राहणाऱ्या या शेतकऱ्याने बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. दोन दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. यासंदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शेतकऱ्याची मुलगी ही दहावीला आहे. त्यामुळेच ऑनलाइन क्लाससाठी वडीलांनी स्मार्टफोन घेऊन द्यावा अशी मागणी ही मुलगी करत होती. यावरुन दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून अनेकदा वादही झाले होते. मंगळवारी हा शेतकरी मुलीसाठी साधा फोन घेऊन आला. मात्र मुलीला हा फोन आवडला नाही. तिने तो जोरात जमीनीवर आपटला. यावरुन बाप लेकीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मुलीशी भांडण झाल्यानंतर रागाच्या हा शेतकरी आपल्या खोलीमध्ये निघून गेला आणि सकाळी थेट त्याचा मृतदेहच आढळून आला.

नक्की वाचा >> …म्हणून ती कौलारू घराच्या छप्परावर चढून करते ‘बीए’चा अभ्यास

“आम्ही काही स्थानिकांकडे यासंदर्भात चौकशी केली. मृत शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाबद्दल आम्ही शेजऱ्यांकडूम माहिती मिळवली. त्यानुसार मागील काही दिवसांपासून त्यांच्या घरात मुलीली स्मार्टफोन घेण्यावरुन वाद सुरु होता. आम्ही शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या हाती सूपूर्द केला आहे. आम्ही या प्रकरणात अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे,” असं मधूपूर पोलीस स्थानकाचे प्रमुख तपास दास यांनी सांगितलं.

देशातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असणाऱ्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी, विद्यापिठांनी ऑनलाइन क्लासेस आणि लेक्चर्सची सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना या ऑनलाइन लेक्चर्समध्ये हजेरी लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी तंत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.