त्रिपुरामध्ये मंगळवारी(दि.9) करोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. आगरतला येथे एका 42 वर्षीय व्यक्तीचा करोनाची लागण झाल्याने मंगळवारी मृत्यू झाला. करोनामुळे गेलेला हा त्रिपुरामधील पहिला बळी ठरला.
पश्चिम त्रिपुरातील चाचू बाजार या गावातील एका व्यक्तीला 1 जून रोजी जीबी पंत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 3 जून रोजी त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. बिस्वा कुमार देबबर्मा असे मृताचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. राज्याचे कायदा व शिक्षणमंत्री रतनलाल नाथ यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
‘त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी यापूर्वी केलेल्या घोषणेप्रमाणे मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल’, अशी माहितीही नाथ यांनी दिली. राज्यात करोनामुळे पहिला मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनीही ट्विटरद्वारे दुःख व्यक्त केलं आहे. ‘आमच्या डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांचा जीव वाचवण्यात अपयश आले’, अशी माहिती देब यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
दरम्यान, मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये जवळपास 800 करोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यातील 192 रुग्ण बरे झाले असून सध्या 608 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 10, 2020 10:41 am