लोक यशस्वी होण्यासाठी देश-विदेशात उच्च शिक्षण घेतात. पण जगात अशाही काही व्यक्ती आहेत, ज्यांनी आपल्या शालेय शिक्षणाला जास्त महत्व न देताना आपल्या कर्तुत्वावर यश प्राप्त केले आहे. तसं पाहिलं तर या यादीत अनेक नावांचा समावेश होतो. पण नुकताच आता आणखी एकाचे नाव या यादीशी जोडले गेले आहे. चंदीगडचा राहणारा त्रिश्नित अरोरा एक असा विद्यार्थी आहे, ज्याने कॉम्प्युटरचे शिक्षण न घेताही इथिकल हॅकिंगमध्ये स्वत:च एक स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे आता त्याचे ५०० हून अधिक क्लायंट देश-विदेशात आहेत. नुकताच त्रिश्नितचा फोर्ब्सच्या आशिया ३० अंडर ३० मध्ये समावेश करण्यात आला आहे. २५ वर्षांचा त्रिश्नितची सायबर सिक्युरिटी कंपनी टीएसीचा सीईओ आहे. तब्ब्ल २ हजार जणांमधून त्रिश्नितचा फोर्ब्सच्या यादीत समाववेश करण्यात आला. निवडणूक आयोग, सीबीआय, पंजाब पोलीस, गुजरात पोलीस, रिलायन्स उद्योगसमूह आणि पेमेंट गेटवेजच्या सिक्युरिटी असेसमेंट त्रिश्नितकडे आहेत. त्रिश्नितने शालेय शिक्षण अर्ध्यातूनच सोडून कॉम्प्युटरमधील बारकावे शिकण्यास सुरूवात केली होती.

त्रिश्नितने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला लहानपणापासून कॉम्प्युटरमध्ये रस होता. तो जास्तीत जास्त वेळ हा व्हिडिओ गेम खेळण्यातच घालवत. त्याच्या सततच्या व्हिडिओ गेम खेळण्याच्या सवयीमुळे पालकांना मोठी चिंता होती. त्याला गेम खेळण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याचे पालक नेहमी कॉम्प्युटरचा पासवर्ड बदलत. पण त्रिश्नित नेहमी तो पासवर्ड क्रॅक करत असत. त्रिश्नितचे हे कौशल्य पाहून त्याच्या वडिलांना मोठे आश्चर्य वाटले होते. नंतर त्यांनी त्याला शाळा सोडण्यास होकार दिला होता. तो शाळेत अनुत्तीर्ण झाल्यानंतरही त्याच्या पालकांनी त्याला कधी रागावले नाही. त्रिश्नित आपल्या यशाचे सर्व श्रेय आई-वडिलांना देतो. शाळा सोडल्यानंतर त्याने कॉम्प्युटर दुरूस्त करणे आणि सॉफ्टवेअर क्लीनअप करण्यासारख्या कामापासून सुरूवात केली. आज त्रिश्नितची स्वत:ची कंपनी आहे.