उत्तराखंडमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल के. के. पॉल यांनी रावत आणि त्यांच्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. रावत हे उत्तराखंडचे अकरावे मुख्यमंत्री आहेत. या शपथ सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. ७० सदस्य असलेल्या उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ५७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सतपाल महाराज यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह हरकसिंह रावत, मदन कौशिक, अरविंद पांडेय, सुबोध उनियाल, यशपाल आर्य आणि प्रकाश पंत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. तर रेखा आर्य आणि धनसिंह रावत यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या चार माजी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

त्रिवेंद्र सिंह रावत हे संघ आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते. २०१३ मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय चिटणीसपदी निवड करण्यात आली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकांपूर्वी अमित शहा उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून काम करत असताना, रावत यांनी सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली होती. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपने त्यांना राज्याचे प्रभारी म्हणून पाठवले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्पष्ट बहुमतही मिळवले. रावत यांनी डोईवाला विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या हिरासिंह यांचा २४ हजारांवर मताधिक्याने पराभव केला. २००२ नंतर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ५७ वर्षीय रावत हे भाजपकडून उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारे पाचवे नेते आहेत. २००० मध्ये उत्तर प्रदेशापासून वेगळे होऊन स्वतंत्र उत्तराखंड राज्य झाले त्यावेळी भाजपचे नित्यानंद स्वामी हे पहिले मुख्यमंत्री झाले. २००१ मध्ये भाजपने स्वामी यांना पदावरून दूर करून बी. एस. कोश्यारी यांना मुख्यमंत्रीपदी संधी दिली होती.