पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला एक ट्विट चांगलेच महागात पडले आहे. बुधवारी शोएबने ‘हमारा पाकिस्तान जिंदाबाद’ हे ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शोएबला हैदराबादमध्ये पाऊल न ठेवण्याची धमकी देण्यात आली. तर भाजपा आमदार राजा सिंह यांनी शोएबची पत्नी सानिया मिर्झाला तेलंगणाच्या ब्रँड अॅम्बेसेडर पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

शोएबच्या ट्विटनंतर हैदराबादच्या स्थानिकांनीही ट्विटरवर तीव्र नाराजी व्यक्त केली. हैदराबादमध्ये पाऊल ठेवल्यास हल्ला करण्याची धमकीही त्याला देण्यात आली. ‘तेलंगणामध्ये आल्यावर तुम्ही पाकिस्तानला परत कसे जाणार हे आम्ही बघूच,’ असा धमकीवजा इशारा एका युजरने दिला. तर काहींनी शोएबच्या ट्विटवर सानियाने प्रतिक्रिया द्यावी असे म्हटले.

भाजपा आमदार राजा सिंह यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे सानियाकडून ब्रँड अॅम्बेसेडरचे पद काढून घेण्याची मागणी केली. ‘जेव्हा संपूर्ण देश पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादी कारवायांविरोधात आहे, त्यांच्या सेनेकडून सतत हल्ले होत आहेत आणि अशा परिस्थितीत आमच्या ब्रँड अॅम्बेसेडरचे पती भारताविरोधात बोलत आहेत. हे अजिबात सहन केले जाणार नाही,’ असं ते म्हणाले. यासोबतच त्यांनी सानियाच्या जागी सायना नेहवाल, पीव्ही सिंधू किंवा माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारख्या खेळाडूंना ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्याचा सल्ला दिला. तर टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी शोएब मलिकला भारतात प्रवेश करण्यावर बंदी आणण्याची मागणी केली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सानियाने निषेध करत ट्विट केले होते. त्यानंतर बुधवारी तिने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. सेलिब्रिटींबद्दल चुकीचं मत व्यक्त करण्यापेक्षा देशाची सेवा करा असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं. ‘सेलिब्रिटी आहोत म्हणून आम्ही ट्विटर, इन्स्टाग्रामवर हल्ल्याचा निषेध व्यक्त केला पाहिजे असा विचार करणाऱ्या लोकांसाठी ही पोस्ट आहे. सार्वजनिकरित्या किंवा सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याचा निषेध करण्याची मला गरज वाटत नाही. मी माझ्या देशाच्या जवानांबद्दल कायम अभिमान आहे. देशाची सुरक्षा करणारे ते खरे हिरो आहेत. १४ फेब्रुवारी हा भारतासाठी काळा दिवस होता आणि असा दिवस पुन्हा कधीच येऊ नये अशी मी आशा करते. तुम्हीसुद्धा द्वेष पसरवण्यापेक्षा देशाच्या शांतीसाठी प्रार्थना करा. इतरांना ट्रोल करून तुम्हाला काहीच मिळणार नाही,’ असं तिने पोस्टमध्ये लिहिलं.