आफ्रिकेतील मोझंबिक येथे आलेल्या चक्रिवादळाने हाहाकार उडवला आहे. या चक्रिवादळाचे नाव ईदाई असे आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल १८० लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मोझंबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलप न्युसी यांनी मृतांची संख्या १ हजारावर गेली असण्याची भीती व्यक्त केली आहे. या चक्रीवादळामुळे हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. ताशी १७७ किमी वाऱ्याच्या वेगाने आलेल्या या चक्रीवादळाने जनजीवन पार विस्कळीत करुन सोडले आहे. जीव वाचवण्यासाठी बरेच लोक झाडांवर चढून बसले आहेत. त्यांची सुटका करण्याचं तसंच सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

कोणत्याही आफ्रिकन देशामध्ये आलेली ही आजवरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे असे म्हटले जात आहे. या वादळामूळे बैरा शहराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या शहराची लोकसंख्या केवळ ५ लाख आहे. बैरा हे शहर सोफाला प्रांतात येते. या प्रांताचे राज्यपाल अल्बर्टो मोडंलेन यांच्या मते देशातील प्रत्येक जण आपत्तीचा सामना करत आहे. बचाव पथकात काम करणाऱ्या युनायटेड नेशनचे कर्मचारी जेराल्ड बोरुक यांनी दिलेल्या माहितीनुसार आपत्तीग्रस्त परिसरात जवळपास सर्व घरं मोडकळीला आली आहेत. ते म्हणाले, या आपत्तीत एकही इमारत वाचलेली नाही. वीज, दळणवळण यंत्रणा कोलमडली आहे. रस्त्यांवर सर्वत्र विजेचे खांब पडलेले आहेत. अनेकांनी आपलं घरं गमावली आहेत. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे लोकांना लवकरात लवकर मदत पोहोचवणे हेच त्यांचे ध्येय आहे.

ईदाई नामक हे चक्रिवादळ केवळ मोझंबिक देशापुरतेच मर्यादीत राहिले नाही तर ते पार झिम्बाब्वे व मालवी या दोन देशांमध्येही पोहोचले आहे. या दोन देशांमध्ये आतापर्यंत एकूण २२० लोकांनी प्राण गमावले आहेत. या तिन्ही देशांमध्ये राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे.