सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करताना पकडण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद याकुम नावेद याला जम्मूत आणण्यासाठी मदत करणाऱ्या ट्रकचालकाला अटक करण्यात राष्ट्रीय तपास संस्थेला यश मिळाले आहे.

नावेद आणि त्याचा वरिष्ठ साथीदार यांनी उधमपूर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवानांना प्राण गमवावे लागले होते. दोन स्थानिक तरुणांच्या धाडसामुळे लष्कराने नावेदला पकडले. या प्रकरणी नावेदला जम्मूमध्ये आणणारा ट्रकचालक खुर्शिद अहमद याला पकडण्यात आले असून तो लष्कर ए तैयब्बाचा भूमिगत दहशतवादी असल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खुर्शिद हा अवंतीपूरचा रहिवाशी आहे. खुर्शिदने २० जुलै रोजी नावेद आणि त्याचा साथीदार मोहम्मद नोमन मोमिन यांना जम्मू येथे आणून सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या हालचाली टिपता येतील अशा ठिकाणी सोडले. मात्र, या वेळी या दहशतवाद्यांनी अखेरच्या क्षणी हल्ला न करता काश्मीर खोऱ्यात परतण्याचा निर्णय घेतला अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.