केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास अपघात झाला. कर्नाटकाच्या हावेरी जिल्ह्यातील हालागिरी येथे एका ट्रकने हेगडे यांच्या ताफ्यातील गाडीला धडक दिली. हा वरवर अपघात वाटत असला तरी हा अपघात नसून आपल्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता असा दावा अनंत कुमार हेगडे यांनी केला आहे.

हालागिरी येथून जात असताना ट्रकने माझ्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने मी ज्या गाडीत बसलेलो ती गाडी वेगात असल्यामुळे धडक टळली पण ताफ्यातील दुसऱ्या गाडीला ट्रक धडकला असे हेगडे म्हणाले. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून नासीर असे त्याचे नाव आहे. हेगडे यांनी अपघातानंतर घटनास्थळावरचा व्हिडिओ आणि अटक केलेल्या ट्रक चालकाचे फोटो टि्वटरवर पोस्ट केले आहेत.

या अपघातात एस्कॉर्ट कारमधील काही जण जखमी झाले आहेत. खांद्याला फॅक्चर झाले आहे. या घटनेकडे बघितले तर हा अपघात वाटत नाही. हा मला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न होता. ड्रायव्हरने जाणीवपूर्वक माझ्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला. मी ज्या गाडीत होतो त्या गाडीचा वेग चांगला असल्यामुळे सुदैवाने ही धडक टळली असे हेगडे म्हणाले.

अपघाताच्यावेळी ट्रक चालक व्यवस्थित होता. त्याने मद्यपान केलेले नव्हते असे हेगडे म्हणाले. अनंत कुमार हेगडे हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नरेंद्र मोदी सरकारमध्ये ते केंद्रीय कौशल्य विकास खात्याचे राज्यमंत्री आहेत.