‘‘धर्माचा आधार घेऊन अनेक लोक हिंसाचार करतात. मात्र खऱ्या धर्मात द्वेष आणि भेदभावाला स्थान नसते. असे सांगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
स्वामी विवेकानंद यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दोघेही बोलत होते. ‘‘स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला धर्मनीतीबाबत महान संदेश दिला आहे. कुणाचाही द्वेष न करणे आणि कोणताही भेदभाव न करणे हीच खरी धर्मनिष्ठा आहे. एकमेकांचा आदर आणि सहिष्णुता हाच खरा धर्म आहे, असे विवेकानंद यांनी सांगितले. विवेकानंद यांचे  तत्त्वज्ञान आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. ज्यांची धर्मावर खरी श्रद्धा आहे, ते कधीही असहिष्णू नसतात असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
 विवेकानंदांची शिकवण सर्व तरुणांनी आत्मसात केली पाहिजे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. स्वामीजींचे तत्त्वज्ञान तरुणांसाठी प्रभावी आहे, असे त्या म्हणाल्या.