चुकीचे वार्ताकन करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘अमान्य’ ठरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाने प्रसारमाध्यमांवर कठोर टीका केली असून, नवे प्रशासन या प्रकाराविरुद्ध ‘संपूर्ण ताकदीनिशी’ लढेल आणि कदाचित माध्यमांसोबतच्या आपल्या संबंधांचा ‘फेरविचारही’ करेल, असे म्हटले आहे.

अध्यक्षांना अमान्य ठरवण्याबाबत माध्यमे झपाटलेली आहेत, मात्र आम्ही गप्प बसून हे घडू देणार नाही. आम्ही या प्रकाराविरुद्ध दररोज सर्वशक्तिनिशी लढा देऊ, असे व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रेन्स प्रीबस यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कार्यक्रमाला गर्दी किती होती हा मुद्दा नाही, तर अध्यक्षांना एका दिवसात अमान्य ठरवण्यासाठीचे हल्ले व प्रयत्न हा मुद्दा असून आम्ही हा प्रकार गप्प राहून पाहणार नाही, असे प्रीबस म्हणाले.

यापूर्वी, शुक्रवारी अध्यक्षांच्या उद्घाटनप्रसंगी जमलेल्या गर्दीबाबत माध्यमांनी दिलेल्या वृत्ताबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना ट्रम्प यांनी पत्रकार ही ‘पृथ्वीवरील सर्वात अप्रामाणिक जमात’ असल्याचे म्हटले होते.

अमेरिका भेटीचे निमंत्रण इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्वीकारले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले अमेरिका भेटीचे निमंत्रण इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी स्वीकारले आहे. नेत्यानाहू यांनी पुढील महिन्यात व्हाइट हाऊस येथील बैठकीसाठी यावे असे ट्रम्प यांनी फोनवरून त्यांना सांगितले होते. उभय नेत्यात मध्य पूर्वेतील सुरक्षा स्थितीवर चर्चा झाली. ट्रम्प यांनी इस्त्रायलशी लष्करी, गुप्तचर व सुरक्षा सहकार्यावर भर दिला असून दोन्ही देशांतील सखोल भागीदारीचे ते द्योतक आहे असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. ट्रम्प व नेत्यानाहू यांनी अनेक प्रादेशिक प्रश्नावंर एकमेकांशी सल्लामसलत करण्याचे ठरवले असून, त्यात इराणकडून दिल्या जात असलेल्या धमक्यांचा प्रश्नही समाविष्ट आहे. ट्रम्प यांनी नेत्यानाहू यांना फेब्रुवारीत व्हाइट हाऊसमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. आयसिसला नेस्तनाबूत करण्याला प्रशासनाचा अग्रक्रम राहील व इस्रायलच्या सुरक्षेला महत्त्व दिले जाईल, असे ट्रम्प यांनी सांगितल्याचे समजते. पॅलेस्टाइन व इस्रायल यांनी शांततेसाठी थेट वाटाघाटी कराव्यात. त्यातील प्रगतीवर अमेरिका लक्ष ठेवील अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली. ट्रम्प यांचा शपथविधी झाल्यानंतर दोन्ही नेत्यांतील हे पहिले संभाषण आहे. त्यापूर्वी ट्रम्प हे दूरध्वनीवर मेक्सिको व कॅनडाच्या नेत्यांशी बोलले आहेत. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात इस्रायला व अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले, कारण डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांनी पूर्व जेरुसलेम व पश्चिम किनारा भागात केलेल्या वसाहती बेकायदा ठरवण्याबाबत मांडलेल्या ठरावावर अमेरिका तटस्थ राहिली होती. ट्रम्प यांनी अमेरिकी दूतावास तेलअवीव येथून जेरुसलेमला हलवण्यास सांगितले आहे, त्यावर दूरध्वनी संभाषणात चर्चा झाली नसल्याचे सूचित होत आहे.