वॉशिंग्टन : अमेरिकेकडून एच १ बी व्हिसा रोखला जाण्याचे प्रमाण नाटय़मयरीत्या वाढले आहे, असे कॉम्पिट इंडिया या अमेरिकी नियोक्ता कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या गटाने म्हटले आहे. त्यात गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा समावेश आहे.

एच १ बी व्हिसा हा भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक व कंपन्यांमध्ये लोकप्रिय असून, तो अस्थलांतरित दर्जाचा व्हिसा असतो. त्यात अमेरिकी कंपन्यांना परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर घेता येते. विशेष करून जेथे तंत्रकुशलता आवश्यक असेल अशा पदांसाठी कर्मचारी भरताना त्याचा उपयोग केला जातो. तंत्रज्ञान कंपन्या या एच१ बी व्हिसावर अवलंबून आहेत. त्यात भारत व चीन यांच्या कर्मचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर प्राधान्य मिळत असून, दरवर्षी हजारो कर्मचारी या व्हिसावर अमेरिकेत जातात. एच १ बी व्हिसा देण्याच्या पद्धतीत काही बदल करण्यात आले असून ते या व्हिसाचे प्रमाण कमी करणारे व उमेदवारांना व्हिसा देण्यास रोखून धरणारे आहेत, असे मत कॉम्पिट अमेरिका या गटाने अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी किर्सजेन निलसन व अमेरिका नागरिकत्व व स्थलांतर विभाग म्हणजे युसीसचे संचालक फ्रान्सिस सिसना यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

यातील कायदेशीर बाबींवर पत्रात चिंता व्यक्त केली असून, मूल्यमापन निकषातील बदल हे घातक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे नियोक्त्यांना धोरण ठरवताना अनिश्चिततेस सामोरे जावे लागत आहे. युसीसने आरोप केला, की ही संस्था किंवा विभाग त्यांच्या मर्यादेपलीकडे जाऊन निर्बंध लादून नियंत्रण करीत आहे. गेल्या अठरा महिन्यांत एच १ बी व्हिसा रोखण्यात नाटय़मय वाढ झाली असून पुरावे मागितले जात आहेत. एच १ बी व्हिसा रद्द करणे व नाकारणे अशा दोन्ही प्रकारच्या नोटिसा जारी करण्यात येत आहेत.  एच १ बी व्हिसाची मर्यादा वार्षिक ६५००० असून त्यातील पहिले वीस हजार व्हिसा हे अमेरिकेत मास्टर्स पदवी किंवा उच्च शिक्षण असलेल्यांना प्रामुख्याने दिले जातात.