अमेरिकेत प्रवेश दिल्या जाणाऱ्या निर्वासितांची संख्या आणखी कमी करून येत्या वर्षी या निर्वासितांना आजवरच्या नीचांकी संख्येत प्रवेश देण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाने दिला आहे.

आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कमाल १५ हजार निर्वासितांना स्वीकारण्याचा आमची इच्छा असल्याचे प्रशासनाने बुधवारी उशिरा, असा प्रस्ताव देण्याच्या मुदतीच्या केवळ ३४ मिनिटे आधी काँग्रेसला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. २०२० या आर्थिक वर्षांत प्रशासनाने निर्वासितांच्या संख्येवर १८ हजारांची मर्यादा लावली होती व तिची मुदत बुधवारी मध्यरात्री संपली.

काँग्रेस आता या प्रस्तावाचा आढावा घेईल. अशा रीतीने निर्वासितांची संख्या कमी करण्यास काँग्रेसच्या सदस्यांचे तीव्र आक्षेप आहेत, मात्र अधिकारांअभावी हा बदल लागू करणे लोकप्रतिनिधींना भाग पडेल असे दिसते.

मिनेसोटा येथील निवडणूक प्रचारसभेत केलेल्या भाषणात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासितांची संभावना ‘अवांछित बोजा’ असे केल्यानंतर काही वेळातच सुमारे १६.५ टक्क्यांची ही कपात लागू करण्यात आली. आपले प्रतिस्पर्धी व माजी उपाध्यक्ष जो बायडेन हे राज्य निर्वासितांनी भरू पाहात असल्याचा हल्ला त्यांनी या वेळी चढवला.