वॉशिंग्टन  : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने जुन्या स्थलांतर व्यवस्थेत बदल करताना यापुढे गुणवत्तेवर आधारित कायदेशीर स्थलांतराचे प्रमाण ५७ टक्के करण्यास  मंजुरी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे, यात कौटुंबिक व मानवतावादी आधारावर स्थलांतराचाही समावेश आहे.

ट्रम्प प्रशासनाचे सल्लागार व अध्यक्षांचे जावई जॅरेड कुशनर यांनी सांगितले,की स्थलांतर धोरण हे बुद्धिमान व गुणवत्ताधारक लोकांना प्राधान्य देणारे राहील. त्यातून दहा वर्षांत ५०० अब्ज डॉलर्सच्या करमहसुलाची वसुली होण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत  मदत करणाऱ्या लोकांची संख्या त्यामुळे वाढणार आहे, हे लगेच घडणार नसून त्याला वेळ लागेल. ट्रम्प यांच्या आदेशानुसार कुशनर यांनी स्थलांतर सुधारणा प्रकल्पाची धुरा खांद्यावर घेतली असून सुधारणा आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचे कुशनर यांनी म्हटले आहे.  ते म्हणाले,की अमेरिकेची सध्याची स्थलांतर व्यवस्था स्पर्धक देशांच्या तुलनेत कालबाह्य़ झालेली आहे. सध्या कायदेशीर स्थलांतर व्यवस्थेत केवळ १२ टक्के लोक गुणवत्तेच्या आधारे कायदेशीर स्थलांतराचा दर्जा मिळवत आहेत, त्याउलट कॅनडात ५३ टक्के, न्यूझीलंड ५९ टक्के, ऑस्ट्रेलिया ६३ टक्के, जपान ५२ टक्के असे हे प्रमाण आहे. आम्ही अमेरिकेत गुणवत्ताधारित स्थलांतराचे प्रमाण ५७ टक्के करण्याचा प्रयत्न करीत आहोत.