काश्मीर प्रश्नाच्या संदर्भात भारताविषयी टोकाच्या व प्रक्षोभक वक्तव्यांना लगाम घालावा, असा खोचक सल्ला अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना दिला आहे. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी आताच्या कठीण परिस्थितीत संयम पाळण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली आहे.

ट्रम्प यांनी सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे पाकिस्तानातील समपदस्थ इम्रान खान यांना स्वतंत्रपणे दूरध्वनी करून भारत व पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले. ५ ऑगस्ट रोजी भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना कलम ३७० रद्द केल्याने दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे टोकाची वक्तव्ये करून भारतविरोधकांना चिथावणी देत आहेत, अशी तक्रार मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडे केली होती. त्यामुळे ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी बोलताना त्यांना याविषयावर खडे बोल सुनावून टोकाच्या वक्तव्यांना लगाम घालण्याचा सल्ला दिला. मोदी यांच्याशी ट्रम्प यांनी तीस मिनिटे चर्चा केली त्यानंतर इम्रान खान यांना त्यांनी दूरध्वनी केला होता.

ट्रम्प यांनी सोमवारी ट्विट संदेशात म्हटले होते की, सध्याची परिस्थिती कठीण असली, तरी दोन मित्र नेत्यांशी चांगली चर्चा झाली. त्यात व्यापार, सामरिक भागीदारी, भारत व पाकिस्तान यांच्यात काश्मीरवरून निर्माण झालेला तणाव कमी करणे हे मुद्दे होते. इम्रान खान यांनी रविवारी भारत सरकारला फॅसिस्ट व वर्चस्ववादी अशी दूषणे लावली होती. भारतातील अल्पसंख्याक व पाकिस्तान यांना भारतातील सरकारपासून धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती.

व्हाइट हाउसने ट्रम्प व खान यांच्यातील संभाषणाबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की इम्रान खान यांच्याशी भारताबरोबरचा तणाव कमी करण्याबाबत चर्चा झाली. त्यांना प्रक्षोभक वक्तव्ये टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

मोदी यांनी ट्रम्प यांच्या समवेत संभाषणात दहशतवाद व हिंसाचार मुक्त वातावरण तसेच सीमेपलीकडून दहशतवादास आळा घालणे या मुद्दय़ांवर भर दिला, असे पंतप्रधान कार्यालयाने दिल्लीत म्हटले आहे. ट्रम्प यांच्याशी संभाषणात काश्मीर प्रश्नी सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत अमेरिकेने हस्तक्षेप करण्याची विनंती इम्रान खान यांनी केली असून मानवी हक्क संघटनांचे प्रतिनिधी काश्मीरमध्ये पाठवण्याची मागणीही केली आहे, असे परराष्ट्रमंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी म्हटले आहे.