ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये वाढ

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी राहिलेला असतानाच अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प मोठय़ा अडचणीत सापडण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. किमान पाच महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप केल्याने वादग्रस्त ट्रम्प यांचा प्रचार अधिकच धोक्यात आला आहे.

ट्रम्प यांनी महिलांबद्दल केलेल्या अश्लाघ्य आणि लैंगिक पिळवणुकीच्या वक्तव्याबाबतची २००५ मधील व्हिडीओ फीत अलीकडेच जाहीर झाल्यानंतर आता पाच महिलांनी त्यांच्यावर हे आरोप केले आहेत. ट्रम्प यांनी केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाचा सविस्तर तपशील न्यूयॉर्क टाइम्सने दोन महिलांच्या हवाल्याने दिला आहे. त्याचप्रमाणे पीपल मासिकाच्या लेखिका नताशा स्टॉयनॉफ यांनीही ट्रम्प यांच्यावर अश्लाघ्य वर्तनाचे आरोप केले आहेत.

जवळपास तीन दशकांपूर्वी विमानप्रवास करताना ट्रम्प आपल्या बाजूच्या आसनावर होते तेव्हा त्यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचे जेसिका लीड्स (७४) सांगितले. ट्रम्प टॉवरमध्ये काम करताना २००५ मध्ये आपण ट्रम्प यांच्यासमवेत उद्वाहनात होतो, तेव्हा आपण त्यांच्याशी ओळख करण्यासाठी हस्तांदोलन केले तेव्हा ट्रम्प यांनी आपले थेट चुंबन घेतले, असे तेव्हा २२ वर्षे वयाच्या असलेल्या रॅशेल क्रूक्स यांनी सांगितल्याचेही न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.

मिण्डी मॅकगिलिव्हरे (३६) यांनी पाम बीच पोस्टला सांगितले की, ट्रम्प यांनी १३ वर्षांपूर्वी मार-ए-लॅगो या त्यांच्या मालकीच्या जागेत दिलेल्या एका पार्टीत आपल्याशी गैरवर्तन केले होते, तर २००५ मध्ये नोकरीसाठी घेतलेल्या मुलाखतीच्या अखेरीला ट्रम्प यांनी आपल्या ओठांचे चुंबन घेतले असे मर्फी या महिलेने सांगितले.

स्टॉयनॉफ यांनी सांगितले की, २००५ मध्ये आपण ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा ट्रम्प यांनी आपल्याला एकांतात नेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याशी गैरवर्तन केले. महिलांचे आपण कधीही लैंगिक शोषण केलेले नाही, असा दावा ट्रम्प यांनी रविवारी झालेल्या एका चर्चेच्या वेळी केला त्यानंतर या महिलांनी पुढे येऊन ट्रम्प यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप केला.

स्टॉयनॉफ यांचे म्हणणे खोटे असून न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्त काल्पनिक आणि पूर्णत: चुकीचे असल्याचा आणि हा चारित्र्यहननाचा प्रकार असल्याचा दावा ट्रम्प यांच्या समर्थकांनी केला आहे. ट्रम्प यांच्या वकिलांनी न्यूयॉर्क टाइम्सवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ट्रम्प यांनी प्रत्येकाचा अपमान केला – क्लिण्टन

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमधील रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येकाचा अपमान करून निवडणुकीचा प्रचार खालच्या पातळीवर नेल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिण्टन यांनी केला आहे. ट्रम्प आपल्याबद्दल काय भाष्य करतात त्याची आपल्याला पर्वा नाही, मात्र तुमच्याबद्दल ट्रम्प काय बोलतात त्याची चिंता वाटते, त्यामुळे प्रत्येकाच्या बचावासाठी आपण उभे राहणार आहोत, असे हिलरी क्लिण्टन म्हणाल्या.