अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल निश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या राज्यांपैकी मिशिगन व पेनसिल्व्हेनिया येथील टपाली मतदानाच्या मोजणीच्या मुद्दय़ावर ट्रम्प यांच्या प्रचारयंत्रणेने न्यायालयात दावे दाखल केले असून, विस्कॉसिन येथे त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. आता ट्रम्प पुन्हा अध्यक्षपदी विराजमान होतात, की बायडेन त्यांना पराभूत करतात हे या निकालांवर अवलंबून असणार आहे.

ज्या ठिकाणी मतांची हाताळणी व मोजणी होत आहे, त्या ठिकाणी प्रचारमोहिमेतील निरीक्षकांना मुक्त प्रवेश मिळावा, अशी या दोन्ही राज्यांतील दाव्यांमध्ये मागणी करण्यात आली आहे. पेनसिल्व्हेनियातील मतमोजणीत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली असल्याचे वृत्त एका अमेरिकी प्रसारमाध्यमाने दिले आहे. मिशिगनमधील दाव्यातही तेथील मतमोजणी थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवडणुकीनंतर तीन दिवसांपर्यंत मिळालेल्या मतांची मोजणी करावी की नाही, याबाबत पेनसिल्व्हेनियामध्ये यापूर्वीच सुरू असलेल्या एका खटल्यात मध्यस्थी करण्यासाठीही ट्रम्प यांच्या प्रचारकांनी अर्ज केला असल्याचे उपप्रचार व्यवस्थापक जस्टिन क्लार्क यांनी सांगितले.

अनेक ठिकाणांवर आपल्याला ‘खऱ्या अर्थाने’ प्रवेश मिळेपर्यंत आणि याआधीच उघडण्यात व प्रक्रिया करण्यात आलेल्या मतांची पाहणी करण्याची परवानगी मिळेपर्यंत मतमोजणी थांबवावी, अशी आपली मागणी असल्याचे ट्रम्प प्रचारकांनी सांगितले. सध्या ट्रम्प डेमॉक्रॅटिक प्रतिस्पर्धी बायडेन यांच्यापेक्षा जरासे पिछाडीवर आहेत. पेनसिल्व्हेनियात ते पुढे आहेत, मात्र जसजशी टपाली मते मोजली जात आहेत, तसतशी त्यांची आघाडी कमी होत आहे.

विस्कॉन्सिनमधील अनेक परगण्यांत अनियमितता झाल्यामुळे, ट्रम्प हे या राज्यात औपचारिकरीत्या फेरमतमोजणीची मागणी करतील, असे त्यांच्या प्रचारमोहिमेतील कार्यकर्त्यांनी सांगितले.

अद्याप अपूर्ण असलेल्या मतमोजणीच्या संकेतांनुसार, विस्कॉन्सिनमध्ये ट्रम्प व बायडेन यांच्यातील मतांचा फरक १ पर्सेटेज पॉइंटपेक्षा कमी असून, यामुळे उमेदवाराला फेरमतमोजणीची मागणी करता येते.

आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष बायडेन यांना ७२ दशलक्षाहून अधिक मते मिळाली असून, अध्यक्षपदाच्या कुणाही उमेदवाराने आतापर्यंत मिळवलेली ही सर्वाधिक मते आहेत.

ट्रम्प यांना आतापर्यंत ६८ दशलक्षाहून अधिक मते मिळाली असून, २०१६ साली डेमॉक्रॅटिक प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करताना त्यांना मिळालेल्या मतांपेक्षा ही ४ दशलक्ष मतांनी अधिक आहेत.