वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या लॅबमधूनच करोना व्हायरसची उत्पत्ती झाली असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यासंबंधीचे पुरावे देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. व्हाइट हाऊसमध्ये ते बोलत होते. वुहानच्या लॅबमधून करोना व्हायरसची उत्पत्ती झाल्याचे तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहात, तुम्ही पुरावे पाहिले आहेत का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला.

त्यावर त्यांनी ‘हो, मी पुरावे पाहिले आहेत. पण त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकत नाही’ असे उत्तर दिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबने त्यांच्यावर होत असलेले आरोप आधीच फेटाळून लावले आहेत. वुहानच्या लॅबमध्ये करोना व्हायरसचे मूळ असून तिथून करोनाच्या फैलावाला सुरुवात झाली या आरोपात काहीही तथ्य नाहीय असे लॅबच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी रॉयटर्सला सांगितले होते.

वुहानमधल्या बाजारातून करोना व्हायरसची सुरुवात झाली. प्राण्यांमधून हा आजार माणसामध्ये आला असे काही तज्ज्ञांचे मत आहे. करोना व्हायरसमुळे अमेरिकेत परिस्थिती हातबाहेर गेली आहे. अमेरिकेत १० लाखापेक्षा जास्त लोकांना करोना व्हायरसची बाधा झाली असून ६३ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अपयशावर बोट ठेवत आहेत.

आणखी वाचा- WHO ला लाज वाटली पाहिजे, चीनची PR एजन्सी असल्यासारखा कारभार, ट्रम्प यांचा हल्लाबोल

चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या इंटर्नकडून अपघाताने करोना व्हायरस लीक झाला असावा, असे वृत्त काही दिवसांपूर्वी फॉक्स न्यूजने दिले होते. त्यावर वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबवर आकसातून हे आरोप केले जात आहेत असे युआन झिमिंग यांनी म्हटले आहे. ते वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये प्राध्यापक आहेत तसेच नॅशनल बायोसेफ्टी लॅबोरटरीचे संचालक आहेत.

आणखी वाचा- अमेरिका करोनाच्या विळाख्यात; ६३ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर १० लाखांपेक्षा अधिक जणांना संसर्ग

“असा कुठलाही विषाणू बनवण्याचा आमचा हेतू नाही आणि आमच्याकडे तशी क्षमताही नाही” असे युआन यांनी रॉयटर्सला लिखितमध्ये दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. ‘Covid-19 च्या जीनोममधून हा विषाणू मानवाने बनवल्याची कुठलीही माहिती अजूनपर्यंत तरी समोर आलेली नाही’ असे युआन यांनी सांगितले.