अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प H-1B सह रोजगार देणारे काही व्हिसा स्थगित करण्याचा विचार करत आहेत. याचा भारतीयांना मोठया प्रमाणात फटका बसू शकतो. आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या भारतीय तरुण-तरुणींकडून मोठया प्रमाणात H-1B व्हिसासाठी अर्ज केला जातो.

करोना व्हायरसच्या साथीमुळे अमेरिकेत लॉकडाउन करण्यात आल्याने तिथे मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अमेरिकेतील स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी डोनाल्ड ट्रम्प H-1B सह काही व्हिसा स्थगित करण्याचा विचार करत आहेत. एक ऑक्टोंबरपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात ट्रम्प प्रशासनाकडून ही स्थगिती लागू केली जाऊ शकते. कारण याच काळात नवीन व्हिसा जारी केले जातात.

अमेरिकेत आर्थिक वर्ष ऑक्टोंबरपासून सुरु होते. अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने गुरुवारी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने हे वृत्त दिले आहे. “उद्या असा निर्णय घेतल्यास नव्या H-1B व्हिसा धारकांना स्थगिती रद्द होईपर्यंत अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही तसेच जे आधीपासूनच H-1B व्हिसावर अमेरिकेत काम करत आहेत, त्यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही” असे वृत्तामध्ये म्हटले आहे.

H-1B व्हिसावर अमेरिकन कंपन्यांना विविध परदेशी कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवता येते. अमेरिकन टेक्नोलॉजी कंपन्या दरवर्षी H-1B व्हिसाच्या आधारे हजारो भारतीय आणि चिनी तरुणांना नोकऱ्या देतात. ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतल्यास आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो भारतीयांना याचा फटका बसू शकतो. H-1B व्हिसावर अमेरिकेत असलेल्या अनेक भारतीयांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असून ते मायदेशी परतले आहेत.