काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी मी मध्यस्थाची भूमिका पार पाडायला तयार आहे असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं होतं. एवढंच नाही तर काश्मीर प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्याला मदतीचं आवाहन केलं होतं असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र ट्रम्प खोटं बोलत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याकडे काश्मीरप्रश्नी कोणतंही आवाहन केलं नव्हतं असं भारतीय परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलं. ज्यानंतर अमेरिकेनेही वक्तव्यापासून माघार घेतली. मात्र ट्रम्प जे बोलले त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांना काश्मीर प्रश्न माहितच नाही त्यामुळे ते काय बोलले त्यांना कळलंच नसावं असं काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी ‘तिसऱ्या’ कुणाचीही आवश्यकता नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांना अशाप्रकारचे आवाहन करतील ही शक्यताच नाही असेही थरुर यांनी म्हटलं आहे. भारत आणि पाक या दोन्ही देशांमधला काश्मीर प्रश्न काय आहे ते ट्रम्प यांना नीट कळले नसावे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याकडे मध्यस्थाची भूमिका घ्या असे म्हणणेच शक्य नाही असेही थरुर यांनी म्हटले आहे.

जर भारताला पाकिस्तानशी बोलायचं आहे तर भारताने थेट चर्चा केली पाहिजे आणि हेच भारताचे धोरण आहे. भारताला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही असंही शशी थरुर यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान जेव्हा त्यांनी काश्मीरचा मुद्दा मांडला तेव्हा आपल्याला यामध्ये मध्यस्थी करायला आवडेल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.