अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदान व मतमोजणीतील गैरप्रकारांबाबत न्यायालयात दावे दाखल केले असले तरी अटीतटीच्या राज्यांत त्यांना या खटल्यांत फटका बसला असून त्यांच्या विधि सल्लागार संस्थेने अंग काढून घेतले आहे.

संघराज्य न्यायालयाने पेनसिल्वेनियातील मतमोजणीबाबत दाखल केलेल्या खटल्यात ट्रम्प यांचा पराभव झाला असून ९३०० टपाली मते बाद करण्याची मागणी ट्रम्प यांच्या वतीने विधि सल्लागार संस्थेने खटल्यात केली होती, पण ती संघराज्य न्यायालायाने फेटाळून लावली. त्यामुळे या विधि सल्लागार संस्थेला ट्रम्प प्रचार गटाच्या टीकेचे धनी व्हावे लागल्यामुळे त्यांनी ट्रम्प यांच्यासाठी काम करणे बंद केले आहे. देशात  कोविड १९ साथ सुरू असताना नागरिकांना मतदानासाठी तीन दिवस वाढ दिली असेल तर त्यात गैर काही नाही, असा निकाल मुख्य न्यायाधीश डी. ब्रुक्स स्मिथ यांनी दिला असून त्यांनी सांगितले, की लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचे मत मोजले गेलेच पाहिजे असे आमचे मत आहे. पेनसिल्वेनियातील न्यायालयाने ६ नोव्हेंबरला झालेले टपाली मतदान ग्राह्य धरणे चुकीचे नसल्याचा निकाल दिला होता.  रिपब्लिकन पक्षाने अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाला यात फेरविचाराची विनंती केली आहे. पण खरे तर पेनसिल्वेनियात उशिराचे फारसे मतदान झालेले नाही ,  त्यामुळे विजयी उमेदवार जो बायडेन यांना या उशिराच्या मतदानाचा फार फायदा झाला अशातली परिस्थिती नाही. माजी उपाध्यक्ष असलेले जो बायडेन यांना  पेनसिल्वेनियात ६८ लाख मतांमध्ये ट्रम्प यांच्यावर साठ हजार मतांनी विजय मिळवता आला. ट्रम्प यांच्या प्रचार समितीने पेनसिल्वेनियातील मतमोजणी व मतदानाबाबत १५ कायदेशीर दावे दाखल केले आहेत, पेनसिल्वेनियात वीस प्रतिनिधी मतेअसल्याने त्यांची ही खटपट सुरू आहे. पण त्यांच्याकडे मतदानात व मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचे पुरावे नाहीत. फिलाडेल्फियातही न्यायाधीशांनी एकूण ८३०० टपाली मते फेटाळण्यास नकार दिला असून  इतर राज्यातही रिपब्लिकन पक्षाने असे दावे दाखल केले आहेत. मिशिगनच्या न्यायाधीशांनी शुक्रवारी डेट्रॉइटचे निवडणूक निकाल प्रमाणपत्र जारी करण्यास मंजुरी दिली. त्यातही मतदान व मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा दावा ट्रम्प यांच्या बाजूने करण्यात आला होता पण तो फेटाळला गेला.  बायडेन यांना तेथे १ लाख ४० हजाराचे मताधिक्य असून तेथील मतदानाबाबतचा तिसरा दावा न्यायाधीशांनी फेटाळला आहे. अ‍ॅरिझोनातही मतदानात गैरप्रकार झाल्याचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. ट्रम्प यांच्या ‘पोर्टर राइट मॉरिस अँड आर्थर’ या विधि सल्लागार कंपनीने ट्रम्प प्रचार समितीच्या टीकेनंतर कामातून माघार घेतली.

जॉर्जियात बायडेन, उत्तर कॅरोलिनात ट्रम्प यांना यश

वॉशिंग्टन : अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी जॉर्जियात ऐतिहासिक विजय मिळवून ट्रम्प यांनी २०१६ मध्ये मिळवलेल्या प्रतिनिधी मतांशी बरोबरी साधली आहे. उत्तर कॅरोलिनात ट्रम्प यांनी गड राखला.  बायडेन यांनी जॉर्जिया   रिपब्लिकनांकडून हिसकावले आहे. आता प्रातिनिधिक मतांचे बलाबल बायडेन ३०६, तर   ट्रम्प २३२  झाले आहे. कुठले प्रशासन सत्तेवर येईल हे काळच ठरवील असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले असले तरी ते आता पराभव मान्य करण्याच्या निकट आहेत असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.