भारताने रशियाबरोबर केलेल्या एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिमच्या खरेदी करारावर अद्याप अमेरिकेने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. या करारात भारताला अमेरिकेकडून सवलत मिळण्याची शक्यता धूसर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाबरोबर केलेल्या या कराराबद्दल भारतावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मागच्या आठवडयात भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये एस-४०० करार झाला. अमेरिकेने सीएएटीएसए कायद्यातंर्गत रशियाकडून शस्त्रास्त्र विकत घेण्यावर बंदी घातली आहे. मागच्या वर्षी अमेरिकन काँग्रेसमध्ये हा कायदा मंजूर झाला. फक्त अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सीएएटीएसए कायद्यातून एखादा देशाला सवलत देऊ शकतात.

काल व्हाईटहाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी लवकरच भारतावर काय कारवाई होते ते तुम्ही लवकरच पहाल  असे सांगितले. त्यामुळे भारतावर अमेरिकेकडून निर्बंध घातले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी अमेरिकेने रशियाकडून शस्त्रास्त्र विकत घेतले म्हणून चीनवर अशा प्रकारची कारवाई केली आहे.

कशी आहे एस-४०० सिस्टिम
एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम भारतासाठी हवाई सुरक्षा कवचाचे काम करेल. शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. रशियाने

विकसित केलेल्या एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिमला नाटोने एसए-२१ ग्रोलर असे नाव दिले आहे. जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे.

एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त पाच मिनिटात तैनात करता येईल. तीन वेगवेळया प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे.