अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची करोना विषाणू संसर्गाबाबतची चाचणी केली जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, ‘‘माझ्यात कुठलीही लक्षणे दिसलेली नाहीत पण तरीही चाचणी केली  जाऊ शकते. माझी चाचणी केली जाणार नाही असे मी म्हटलेले नाही, कदाचित ती केली जाईल.’’

व्हाइट हाऊसमधील रोझ गार्डन येथे पत्रकार परिषदेत वारंवार त्यांना तुम्ही करोनाच्या चाचणीला का सामोरे जात नाही असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी चाचणीस तयार असल्याचे सूचित केले. ट्रम्प यांनी गेल्या आठवडय़ात ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसोनारो व त्यांचे दळणवळण प्रमुख  फॅबियो वेंगार्टन यांची फ्लोरिडा येथील मार अ लागो रिसॉर्टवर भेट घेतली होती. यातील बोलसोनारो यांची चाचणी नकारात्मक असली तरी वेंगगार्टन यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीत दिसून आले आहे. या सगळ्या घडामोडींमुळे ट्रम्प यांच्यावर करोना चाचणी करून घेण्यासाठी दबाव वाढला आहे. त्यावर ट्रम्प यांनी सांगितले की, ‘ब्राझीलचे अध्यक्ष व मंत्री यांना  भेटल्यामुळे मी चाचणी करायला तयार झालो असे नाही तर माझी चाचणी केली जाणारच आहे. त्याची वेळ ठरवण्यात येत आहे. मला कुठलीही लक्षणे दिसलेली नाहीत. ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनोरो यांच्याशी माझी बैठक चांगली झाली, ते चांगले व्यक्ती असून ब्राझीलसाठी उत्तम काम करीत आहेत. त्यांची चाचणी नकारात्मक आली होती त्यामुळे मला काही धोका वाटत नाही. मी बोलसोनारो यांच्याबरोबर जेवलो, त्यांच्या समोरच बसलो होतो. दोन तास त्यांच्यासमवेत होतो पण त्यांची चाचणी नकारात्मक होती त्यामुळे ते एक बरे झाले. ’

गेल्या आठवडय़ात व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव स्टीफनी ग्रिशॅम यांनी सांगितले होते की, ‘‘ ट्रम्प यांना सीओव्हीआयडी १९ विषाणूची चाचणी करण्याची गरज नाही कारण ते निश्चित रुग्ण असलेल्या कुणाच्याही संपर्कात आलेले नाहीत व त्यांच्यात कुठलीही लक्षणे नाहीत, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.’’