वॉशिंग्टन : सीरियात आयसिसमध्ये सहभागी झालेल्या अलाबामातील महिलेला तिच्या मुलासह अमेरिकेत परतण्याची परवानगी दिली जाणार नाही, कारण ती महिला अमेरिकेची नागरिक नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.अमेरिकेने केलेल्या दाव्याला सदर महिलेच्या वकिलाने आव्हान दिले आहे. प्रशासनाने हा निर्णय कसा घेतला या बाबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी सविस्तर तपशील दिला नाही.

सदर महिलेचे नाव होडा मुथाना असे असून ती अमेरिकेची नागरिक नाही त्यामुळे तिला अमेरिकेत प्रवेश नाही, असे पॉम्पिओ म्हणाले. तिच्याकडे कोणताही कायदेशीर आधार नाही, तिच्याकडे अमेरिकेचा वैध पासपोर्टही नाही, पासपोर्ट मिळविण्याचा कोणताही अधिकारही नाही किंवा अमेरिकेत येण्यासाठीचा व्हिसाही नाही, असेही ते म्हणाले.

तथापि, मुथाना हिचा जन्म अमेरिकेतील आहे आणि २०१४ मध्ये आयसिसमध्ये भरती होण्यापूर्वी तिच्याकडे वैध पासपोर्ट होता, असा दावा वकील हसन शिबले यांनी केला आहे.

तिने आयसिसची साथ सोडली असून आपल्या १८ महिन्यांच्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी तिला अमेरिकेत परत यावयाचे आहे आणि त्यासाठी तिची कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी आहे, असेही शिबले यांनी म्हटले आहे. मुथाना आणि तिचा मुलगा सध्या सीरियातील निर्वासितांच्या छावणीत आहेत.