बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांच्या अमेरिकेतील वास्तव्यासंबंधी एक वक्तव्य केले आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील हे जोडपे अमेरिकेत राहणार असेल, तर त्यांच्या सुरक्षेचा खर्च अमेरिका उचलणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

“ब्रिटनची राणी आणि युनायटेड किंगडमचा मी मित्र असून, त्यांचा प्रशंसक आहे. हॅरी आणि मेगन युनायटेड किंगडम सोडून कायमस्वरुपी कॅनडाला स्थायिक झाले होते. आता त्यांनी अमेरिकेला येण्यासाठी कॅनडा सोडले आहे. अमेरिका त्यांच्या सुरक्षेचा खर्च उचलणार नाही, ते पैसे त्यांनीच द्यावेत” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन कॅलिफोर्नियामध्ये रहायला आल्याच्या बातम्या येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे टि्वट केले. हॅरी क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या यांचा नातू आहे. अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्केलबरोबर हॅरी मे २०१८ मध्ये विवाहबद्ध झाला. जगभरातील लाखो लोकांनी हा विवाहसोहळा पाहिला. जानेवारी महिन्यात हॅरी आणि मेगन उत्तर अमेरिकेत गेले. कॅनडाच्या व्हँक्युव्ह शहरामध्ये ते राहत होते.