News Flash

उइगर मुस्लीम अत्याचार: ट्रम्प यांचा चीनला दणका; ‘त्या’ विधेयकांवर केली स्वाक्षरी

"हा दिवस अमेरिका आणि उइगरांसाठी अत्यंत महत्वाचा"

फाइल फोटो

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेड वॉर सुरू आहे. अशातच करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधला होता. तसंच करोना व्हायरसला चीन व्हायरस असंही म्हटलं होतं. त्यानंतर हाँगकाँग आणि तैवान प्रश्नावरुनही ट्रम्प यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता केवळ प्रतिक्रिया न देता ट्रम्प यांनी थेट चीनविरोधी विधेयावर स्वाक्षरी करत ते मंजूर केलं आहे. यामुळे आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झालं आहे. चीनमध्ये उइगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकावर सुरु असणाऱ्या अत्याचाराविरोधातील हे विधेयक असल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या विधेयकामुळे अमेरिका आणि चीनमधील संघर्ष आणखीन चिघळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे विधेयकामध्ये

या विधेयकाच्या माध्यमातून अमेरिकेने चीनमधील अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलण्याचं ठरवलं आहे. चीनमधील उइगर मुस्लीम आणि इतर अल्पसंख्यांकावर होत असणाऱ्या अन्यायामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग असलेल्या व्यक्तीविरोधात अमेरिका कारवाई करणार आहे. चीनमधील शिनजियांगच्या पश्चिमेला राहणाऱ्या उझगर मुस्लिमांबरोबरच अल्पसंख्यांकांवर देखरेख ठेवणारे आणि या व्यक्तींविरोधात कारवाई करणारे कोणत्याही व्यक्तीला अमेरिकेमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. विशेष म्हणजे हा नियम येथील सुरक्षा यंत्रणांमध्ये काम करणारे व्यक्ती आणि अधिकाऱ्यांनाही लागू होणार आहे. त्यामुळेच या अल्पसंख्यांकांच्या शिबीरांच्या व्यवस्थापनाचे आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम करणाऱ्यांना या विधेयकामुळे अमेरिकेचे दरवाजे बंद झाले आहेत. चीनमध्ये अल्पसंख्यांक शिबीरांमध्ये एक लाखांच्या आसपास नागरिक असल्याचे सांगण्यात येतं.

पहिलाच देश…

मागील अनेक वर्षांपासून चीनमध्ये अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असल्याची चर्चा जगभरामध्ये आहे. मात्र अशाप्रकारे कोणत्याही देशाने उघडपणे कायदा करत चीनविरोधात भूमिका घेतली नव्हती. मात्र आता ट्रम्प यांनी थेट चीनला आव्हान देत या शिबिरांशी संबंधित सर्व व्यक्तींवर सरकट बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चीनविरोधात उचलण्यात आलेलं हे मोठं पाऊल असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ हे हवाईमध्ये चीनच्या अधिकाऱ्याची भेट घेण्यासाठी गेले असतानाच हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

अनेकांना डांबले…

चीनमधील अल्पसंख्यांकांसाठी लढणाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. उइगर मुस्लिम चीनसाठी धोकादायक असल्याची चीनची भूमिका होती. या नागरिकांविरोधात त्यांच्या धार्मिक परंपरेनुसार दाढी वाढवणे, बुरखा घालण्यावरुन करावाई करण्यात आल्याचे आरोप सातत्याने केले जातात. याचबरोबर देशातील इतर अल्पसंख्यांकांवरही चीनकडून अत्याचार केले जातात. या अल्पसंख्यांकांनाही अज्ञात स्थळी डांबण्यात येते असा आरोप मानवाधिकार कार्यकर्ते करतात. मात्र आता अमेरिकेने अशाप्रकारे अल्पसंख्यांकांना वर्तवणुक देणाऱ्यांना शासन करण्याचा निर्णय घेतला आहे. “हा दिवस अमेरिकेबरोबरच उइगरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे,” अशा शब्दांमध्ये अमेरिकेच्या या निर्णयाचे उझगरांसाठी काम करणाऱ्या नुरी टर्केल यांनी स्वागत केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 3:27 pm

Web Title: trump signs bill for sanctions on china officials over uighur muslim scsg 91
Next Stories
1 भारतीय जवानांनी चिथावल्याचा ‘हा’ परिणाम, चीनची मुजोरी कायम
2 भारत-चीन संघर्ष सुरु असताना नेपाळच्या लष्करप्रमुखांकडून सीमावर्ती भागाचा दौरा
3 जनाधिकार पार्टीचे मुख्य पप्पू यादव यांनी जेसीबीवर चढून चायनीज मोबाइलच्या बॅनरला फासलं काळं