अमेरिकेचे पराभूत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनही पराभव मान्य केलेला नसून ते तो मान्य करण्याची शक्यताही कमीच आहे. आता अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी विजय मिळवल्यानंतर जर ट्रम्प दिलदारपणा दाखवून पराभव मान्य करणार नसतील तर त्यांना व्हाईट हाऊसमधून घालवायचे कसे हे आव्हानच आहे.

मतमोजणी चालू असताना त्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी व्हाइट हाऊसचा वापर करणे अयोग्य होते त्याबाबत चौकशीची शक्यता वर्तवली जात आहे. मतमोजणीनंतर अमेरिकी अध्यक्षपदाची माळ जो बायडेन यांच्या गळ्यात पडल्यानंतर ट्रम्प यांना अजूनही मतमोजणी चालू आहे असेच वाटत आहे. ते पराभव झाल्याचे मान्य करायला तयार नाहीत. त्यांनी रागाच्या भरात बेजबाबदार आरोप केले असून बेकायदा मते मोजली गेल्याचे म्हटले आहे. त्यांनी कायदेशीर  लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.

आपण बऱ्याच मतांनी निवडणूक जिंकली आहे असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. त्यांचे जावई जॅरेड कुशनर यांनी त्यांची भेट घेऊन पराभव मान्य करण्यास सांगितले तरी त्यांनी अजून पराभव मान्य केला नाही.

‘ट्रम्प यांचा पराभव झालेला नाही. ट्रम्प यांनी पराभव स्वीकारू नये, लढा चालू ठेवावा’ असे सांगत फॉक्स न्यूज चॅनेलवर कॅरोलिनाचे सिनेटर लिंडसे ग्रॅहॅम यांनी ट्रम्प यांना चिथावून दिले आहे. निवडणुका पक्षपाती झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनीही ते पराभव स्वीकारणार नाहीत असे सूचित केले आहे. ट्रम्प यांची मुले डोनाल्ड ज्युनियर व एरिक यांनीही वडिलांना पराभव स्वीकारू नका असे सांगत रिपब्लिकनांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.

मतदानाचा विक्रम..

अजूनही मतमोजणी सुरू असून २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत गेल्या पन्नास वर्षांतील उच्चांकी मतदान झाले आहे. यापूर्वी २००८ मध्ये बराक ओबामा निवडून आले त्या वेळी मोठे मतदान झाले होते. या वेळी अध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात गेलेला कौल मोठा आहे. रविवारी जी आकडेवारी मिळाली ती पाहता मतदानास पात्र असलेल्यांपैकी ६२ टक्के लोकांनी मतदान केले. जो बायडेन यांना ७ कोटी ५० लाख मते मिळाली आहे. ट्रम्प यांना सात कोटी मते मिळाली आहेत. पराभूत उमेदवाराला इतकी मते कधी मिळाली नव्हती. किमान १६ कोटी मतदान झाल्याचा अंदाज आहे.

तोपर्यंत अभिनंदन नाही..

दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संबंधांतील न्यायालयीन लढाई संपेपर्यंत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचे अभिनंदन करणार नाहीत, असे क्रेमलिनने जाहीर केले.

करोना संकट, वंशवाद बायडेन प्रशासनाचे प्राधान्य विषय

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन आणि नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी सर्व गोष्टींची ‘यापूर्वीपेक्षा अधिक चांगली’ बांधणी करण्याची तयारी सुरू केली असतानाच; करोना महासाथ, आर्थिक संकट, वंशवाद आणि हवामान बदल यांची हाताळणी करण्यास बायडेन प्रशासनाचे प्राधान्य राहणार असल्याचे त्यांच्या ‘स्थित्यंतर चमूने’ म्हटले आहे. बायडेन यांच्या चमूने त्यांच्या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण करताना आगामी प्रशासन करोना महासाथ, आर्थिक संकट, वंशवाद आणि हवामान बदल या ४ विषयांना धोरणविषयक प्राधान्य देणार असल्याचे नमूद केले.

करोनाविषयक कृती दलाचे डॉ. विवेक मूर्ती अध्यक्ष

अमेरिकेतील करोना महासाथीचा सामना करण्यासाठी नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांना सल्ला देण्यासाठी नेमण्यात आलेल्या कृती दलाच्या ३ अध्यक्षांपैकी एक म्हणून भारतीय- अमेरिकी चिकित्सक डॉ. विवेक मूर्ती यांचे नाव जाहीर करण्यात आले. ४३ वर्षांचे डॉ. मूर्ती हे अमेरिकेचे माजी महाशल्यचिकित्सक (सर्जन जनरल) असून, त्यांच्यासह डॉ. डेव्हिड केस्लर व डॉ. मार्केला नुनेझ- स्मिथ हे सार्वजनिक आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या चमूचे नेतृत्व करतील. अमेरिका हा सध्या जगात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला देश आहे.