पुढील वर्षी होणाऱ्या प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येऊ शकणार नाहीत, असे ट्रम्प यांचे कार्यालय व्हाईट व्हाऊसने भारताला कळवले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या भारतदौऱ्यासाठीचे भारताचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता दुसऱ्या जागतिक नेत्याच्या नावाचा विचार सुरु झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी वॉशिंग्टनमध्ये चर्चेदरम्यान ट्रम्प यांना भारत दौऱ्यासाठी निमंत्रण दिले होते. यावर व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव सारा सॅँडर्स यांनी जुलैमध्ये सांगितले होते की, आम्हाला भारताकडून निमंत्रण मिळाले आहे. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, भारताकडून या निमंत्रणाबाबत पुन्हा एकदा विचारणा झाल्यानंतर व्हाइट हाऊसकडून यावर सोमवारी उत्तर देण्यात आले. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, राष्ट्रपती ट्रम्प यांना २६ जानेवारी २०१९ला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी वैयक्तिक निमंत्रण देण्यात आल्याने आम्ही हा आमचा सन्मान समजतो. मात्र, या दरम्यान काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे भारतातील कार्यक्रमात ते उपस्थित राहू शकणार नाहीत.

व्हाइट हाऊस प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, जेव्हा भारत प्रजासत्ताकदिन साजरा करीत असेल त्याचवेळी ट्रम्प अमेरिकेच्या काँग्रेसमधील दोन्ही सभागृहात वार्षिक स्टेट ऑफ युनियनमध्ये (एसओटीयू) उपस्थितांना संबोधित करणार आहेत. सर्वसाधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम ठरलेला असतो.

व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प आणि मोदींमध्ये वैयक्तिकरित्या मैत्रीचे घनिष्ठ संबंध आहेत. ट्रम्प भारत-अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी प्रतिबद्ध आहेत. ट्रम्प मोदींशी पुन्हा लवकरात लवकर भेटण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. दरम्यान, ३० नोव्हेबंर आणि १ डिसेंबर रोजी अर्जेटिनामध्ये जी-२० शिखर परिषदेत हे दोन्ही नेते सहभागी होणार आहेत. या परिषदेत या दोघांची भेट आणि द्वीपक्षीय संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारताकडून दरवर्षी प्रजासत्ताकदिनानिमित्त आपले सामर्थ्य जगाला कळावे यासाठी जगभरातील विविध नेत्यांना निमंत्रित केले जाते. २०१५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा दुसरा भारत दौरा होता.
मात्र, आता ट्रम्प यांचा नकार आल्यानंतर भारताकडून दुसऱ्या पाहुण्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. यासाठी सरकारकडून तीन देशांच्या नेत्यांच्या नावांवर विचार सुरु आहे. यामध्ये एका प्रमुख अफ्रिकन देशाचा समावेश आहे.