एकता व आनंदाने साजरा करण्याच्या अमेरिकी स्वातंत्र्यदिनी अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकी मूल्यांचे संवर्धन करण्याची हाक देतानाच डावे, लुटेरे, आंदोलक अशा शेलक्या विशेषणांनी त्यांच्या राजवटीच्या विरोधात असलेल्या सर्वाची निर्भत्सना केली. करोना विषाणू पसरवल्याबाबत त्यांनी चीनवरही नेहमीप्रमाणे आरोप केले. ट्रम्प यांनी ४ जुलैच्या स्वातंत्र्यदिनी केलेले  भाषण हे तक्रारी व विरोधकांशी संघर्षांनेच भरलेले होते त्याला निवडणूक  प्रचाराचे स्वरूप आले होते.  ट्रम्प यांनी करोना काळात समर्पणाने काम करणाऱ्या देशातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धन्यवाद देतानाच  विरोधकांवर तोंडसुख घेताना देशाच्या भूतकाळाबाबत आदर नसणाऱ्यांना धारेवर धरले. ते म्हणाले की, मूलतत्त्ववादी डावे, अराजकवादी लोक, आंदोलक, लुटेरे  व ज्यांना आपण काय करतो आहोत तेच कळत नाही अशांचा पराभव करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. संतप्त जमावाला आम्ही पुतळे पाडू देणार नाही. इतिहास पुसू देणार नाही. अमेरिकी जीवनाची परंपरा व मूल्ये आम्ही जपणार आहोत. १४९२ मध्ये कोलंबसाने अमेरिका शोधली तेव्हापासून आमची मूल्ये व इतिहास वेगळा आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात करोना साथीत बळी पडलेल्यांचा उल्लेखही केला नाही. अमेरिकेत १ लाख ३० हजार बळी गेले आहेत. ट्रम्प यांनी त्यांना पाठिंबा न देणाऱ्या गटांवर सडकून टीका केली. आपला इतिहास व भूतकाळ हे ओझे नाही तर गौरवशाली परंपरा आहे असे ते म्हणाले.

‘अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे’

वॉशिंग्टन : ‘अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे’, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या २४४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या, त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.