नोव्हेंबर महिन्यात होणारी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याबाबतची सूचना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होती, मात्र स्वपक्षातील ज्येष्ठांकडूनच त्याला पाठिंबा न मिळाल्याने ट्रम्प यांच्यावर ही सूचना मागे घेण्याची वेळ आली आहे.

टपाली मतदानामध्ये गैरप्रकार होतील अशी भीती व्यक्त करून ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर टाकण्याचे सूतोवाच केले होते. टपाली मतदानामुळे २०२० हे निवडणूक वर्ष इतिहासामध्ये गैरप्रकाराचे ठरेल, त्यामुळे मतदान योग्य प्रकारे होण्यासाठी निवडणूक पुढे ढकलावी का, असे ट्वीट ट्रम्प यांनी केले होते.

सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची इच्छा असलेल्या ट्रम्प यांना डेमोकॅट्रिक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपाध्यक्ष जो बायडेन यांनी चांगलेच आव्हान दिले आहे. जनमत चाचणीतही बायडेन यांनी ट्रम्प यांच्यापेक्षा बाजी मारली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याची कल्पना प्रथमच जाहीरपणे मांडली. त्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तातडीने सडकून टीका केला. त्याचप्रमाणे ट्रम्प यांना रिपब्लिकन पार्टीतील ज्येष्ठ नेत्यांकडूनही पाठिंबा मिळाला नाही. त्यानंतर ट्रम्प यांनी आपली सूचना मागे घेतली.

व्हिसाबाबतची फसवणूक टाळण्यासाठी कठोर नियम 

रोजगारावर आधारित व्हिसांबाबतचे गैरप्रकार आणि फसवणूक टाळण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प प्रशासनाने अनेक पावले उचलली आहेत, असे अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी काँग्रेससमोर स्पष्ट केले. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय व्यावसायिकांमध्ये मागणी असलेल्या एच१बी व्हिसाचाही त्यामध्ये समावेश आहे. यूएस सिटिझनशिप अ‍ॅण्ड इमिग्रेशन सव्‍‌र्हिसेसने यासाठी (यूएससीआयएस) अमेरिकेतील कामगारांचे संरक्षण करणारे आणि रोजगारावर आधारित व्हिसांचा होणारा गैरवापर आणि फसवणूक यांना आळा घालणाऱ्या नियमांची, धोरणांची अंमलबजावणी केला आहे, असे यूएससीआयएसचे उपसंचालक जोसेफ एडलो यांनी गुरुवारी काँग्रेससमोर स्पष्ट केले.