अमेरिकेत करोना विषाणूने कहर केला असतानाच आता अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे मागणी नोंदवण्यात आलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या तातडीने पाठवण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करून मूळ मलेरियावरचे पण करोनावर गुणकारी मानले जाणारे हे औषध तातडीने पाठवावे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी शनिवारी पंतप्रधान मोदी यांना दूरध्वनी केला होता. त्यात त्यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या अमेरिकेत वितरणासाठी पाठवाव्यात अशी विनंती केली.

ट्रम्प यांनी शनिवारी व्हाइट हाऊस येथे घेतलेल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचा मोठा साठा आहे त्यामुळे अमेरिकेने जी मागणी या गोळ्यांसाठी नोंदवली आहे ती भारताने पूर्ण करावी असे आपण मोदी यांना सांगितले आहे.  अमेरिकेने नेमक्या किती प्रमाणात या गोळ्यांची मागणी नोंदवली आहे हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. अमेरिकेत आता तीन लाख लोकांना करोनाचा संसर्ग झाला असून आठ हजार बळी गेले आहेत.

अमेरिका हे आता करोनाचे मोठे केंद्र ठरत आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने यापूर्वी मलेरिया विरोधी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचा वापर करोनावर उपचारांसाठी करण्यास मान्यता दिली आहे. ट्रम्प यांनी या गोळ्यांचा सकारात्मक परिणाम करोना उपचारात दिसून आल्याचे म्हटले असून तसे असेल तर ती दैवी देणगीच समजावी लागेल, अशा भावना व्यक्त केल्या. अमेरिकेतील अनेक वैज्ञानिकांनी  हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या करोनावर प्रभावी औषध असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत असे म्हटले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने या औषधाला करोना विरोधी उपचारात तात्पुरती मान्यता दिली आहे. अमेरिकेत १ ते २ लाख बळी जातील असा आरोग्य तज्ञांचा अंदाज आहे.