काहीही झाले तरीही शबरीमला मंदिरात जाणारच अशी भूमिका घेऊन काही महिला सहकाऱ्यांसह केरळमध्ये गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई रात्री पुण्यात परतणार आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. शबरीमला मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही असा इशारा देऊन तृप्ती देसाई केरळला गेल्या. मात्र त्यांना कोची विमानतळावरच रोखण्यात आले. तिथेही त्यांनी ठिय्या दिला. तसेच मंदिरात प्रवेश करणारच अशी आक्रमक भूमिका घेतली. ज्यानंतर त्यांच्याविरोधात आंदोलनं सुरु झाली.

तृप्ती देसाईंनी परत फिरावं अन्यथा त्यांना आमच्या छातीवर पाय देऊन मंदिरात जावं लागेल असा इशाराच विमानतळाबाहेर ठाण मांडून बसलेल्या राहुल इश्वर यांनी काही वेळापूर्वीच दिला. इतकेच नाही शबरीमला कर्मा समितीच्या महिलांनीही तृप्ती देसाईंच्या भूमिकेविरोधात आंदोलन केले. त्यामुळे तृप्ती देसाई यांनी परतण्याचा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर मंदिर, कोल्हापूचे महालक्ष्मी मंदिर आणि मुंबईतील हाजी अली दर्गा या ठिकाणी आंदोलन केले. केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना जाण्यासाठी सुप्रीम कोर्टाने संमती दिली आहे. तरीही महिलांना प्रवेश नाकारण्यात आला. गेल्या महिन्यात आणि सहा नोव्हेंबरला या ठिकाणी हिंसाचारही घडला. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी उद्या म्हणजेच १७ नोव्हेंबरला शबरीमला मंदिरात जाणारच अशी भूमिका घेतली. त्यासाठी त्या आज कोची विमानतळावर पोहचल्या मात्र त्यांना विमानतळावरच रोखण्यात आले. आता अखेर त्या पुण्यात परतणार आहेत असे समजते आहे.